छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
चौथी महाराष्ट्र महिला हिंसा मुक्ती परिषद अंबाजोगाई (Ambajogai) येथे २२, २३, २४ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने शहरातील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रामध्ये सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी ‘मानवलोक’च्या अरुधंती पाटील यांनी परिषदेमागची भूमिका स्पष्ट केली.
पहिली महाराष्ट्र महिला हिंसा मुक्ती परिषद पुण्यात, दुसरी मुंबई तर तिसरी नाशिक येथे पार पडली. यावेळी परिषदेत प्रामुख्याने मराठवाड्यातील महिलांचे प्रश्न समोर यावेत, त्यावर चर्चा व्हावी. महिला धोरण ठरवताना या कार्याचा उपयोग व्हावा तसेच महिलांवर होणारी हिंसा याविरुद्ध एकत्र येऊन ताकद निर्माण करावी हा हेतू आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली. चर्चेमध्ये मंगल खिंवसरा, डॉ. रश्मी बोरीकर, अॅड. ज्योती पत्की, अॅड. सुजाता पाठक, शंकुतला लोमटे, सुलभा खंदारे, सुनिता जाधव, मंजुषा माळवतकर, रजनी नागवंशी, लता जाधव, ज्योती नांदेडकर, तिलोत्तमा झाडे, दीक्षा पवार, सविता जाधव, मनिषा खळे, नंदकिशोर राऊत यांनी सहभाग घेतला. यावेळी सूत्रसंचलन डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी केले.
येत्या २४ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी परिषदेच्या निमित्ताने सादर करायच्या शोधनिबंधासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार आहे. ज्यांना या कार्यशाळेत व परिषदेत सहभागी व्हायचे असेल अशा ग्रासरुट लेव्हलवर कार्य करणाऱ्या व्यक्तींनी डॉ. आरतीश्यामल जोशी यांच्याशी ९९२३१०६५६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सजगच्या वतीने करण्यात आले आहे.