Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : 32 गावातील 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

Ahilyanagar : 32 गावातील 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

साकळाई योजनेबाबत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मानले सरकारचे आभार

अहिल्यानगर/ श्रीगोंदा |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतील साकळाई उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता वेग आला आहे. दीर्घकाळ कागदोपत्री प्रक्रिया, आश्वासने आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे 967 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया मार्गी लागल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

या योजनेमुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 जिरायती गावांमधील सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळण्याबरोबरच शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीतही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. साकळाई योजनेची मुहूर्तमेढ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी रोवली होती. जिरायती भागातील शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा मिळावी, दुष्काळी गावांचा कायापालट व्हावा आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळावा, या उद्देशातून या योजनेची संकल्पना पुढे आली. मात्र अनेक वर्षे सरकारे आणि लोकप्रतिनिधी बदलत राहिले तरी योजनेचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. प्रत्येक निवडणुकीत साकळाईचा मुद्दा चर्चेत येत होता; मात्र निवडणुकीनंतर प्रक्रिया पुन्हा संथ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी होती.

2022 नंतर या योजनेच्या प्रक्रियेला निर्णायक गती मिळाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाईचा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरत अधिकार्‍यांच्या बैठका, प्रस्तावांचा पाठपुरावा, तांत्रिक अडचणी आणि सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्न केले. 2024 मध्ये योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेला प्रत्यक्ष आकार मिळण्याची आशा निर्माण झाली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेसमोरील महत्त्वाचा प्रश्न होता तो पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा. हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने योजनेच्या पुढील प्रक्रियेबाबत शेतकर्‍यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता.

2024-25 मध्ये जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्यानंतर साकळाई योजनेच्या प्रक्रियेला पुन्हा वेग मिळाला. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेत योजनेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता आणि 1,234 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने योजनेच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.

32 जिरायती गावांना लाभ
साकळाई उपसा सिंचन योजनेचा लाभ अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 जिरायती गावांना अपेक्षित आहे. यामध्ये चिखली, कोरेगाव, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिरढोण, हिवरे झरे, बाबुर्डी बेंड, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिद्धी, तांदळी, बडगाव, रुई छत्तीसी, आंबिलवाडी, गुणवडी, गुंडेगाव, राळेगण, मांडवगण, मठ पिंप्री, हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा आणि कामठी या गावांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...