मुंबई | Mumbai
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या पाच दिवसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी मुंबई वाहतूक नियंत्रणाला धमकीचा संदेश आला आहे.
संदेश देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. यात ५ कोटींचाही उल्लेख आहे. ५८ वर्षीय सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी सलमानला वाय सुरक्षा दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी मुंबई पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणातील पानिपत येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुख्खा असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो बिष्णोई टोळीचा शार्प शूटर असून त्याला नवी मुंबईत आणण्यात आले आहे.
गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. मुंबई पोलिस आणि हरयाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुख्खाला पानिपत येथून अटक करण्यात आली. २०२२ मध्ये, लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरून सुख्खाने सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती. रेकीनंतर सुखाला सलमानवर हल्ला करायचा होता, पण त्याचा प्लॅन फसला.
दरम्यान, गेल्या शनिवारी सलमान खानचे जवळचा सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नेते बाबा सिद्दीकी हे मुलगा झीशानच्या कार्यालयातून बाहेर पडला होते. त्यानंतर त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दीकींच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे रात्री ११.२७ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती.