Monday, July 6, 2026
Homeमहाराष्ट्रBus Accident : समृद्धी महामार्गावर रिल्सच्या नादात भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकलीचा...

Bus Accident : समृद्धी महामार्गावर रिल्सच्या नादात भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा । Buldhana

समृद्धी महामार्गावर चालकाच्या बेजबाबदारपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चालत्या बसमध्ये रिल्स बनवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस उलटून भीषण अपघात झाला. मेहकर टोलनाक्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत एका दीड वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असून, २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाच्या या जीवघेण्या करामतीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी लक्झरी बस समृद्धी महामार्गावरून जात असताना चालकाच्या कॅबिनमध्ये ७ ते ८ जण बसलेले होते. यावेळी बसचा चालक आणि क्लिनर मोबाईलवर ‘रिल्स’ बनवण्यात गुंग झाले होते. ड्रायव्हर चक्क गाडी चालवताना कॉलर वर करून नाचत होता आणि क्लिनर त्याचे चित्रीकरण करत होता. रिल्स बनवण्याच्या नादात चालकाचे वाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. समोर मेहकरचा टोलनाका आला असतानाही वेगावर नियंत्रण न ठेवता, चालकाने अचानक गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाली आणि जवळच असलेल्या एका चारचाकी वाहनावर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात एका दीड वर्षाच्या निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील २० ते २५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या धडकेत बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक वारंवार गाणी लावून स्टंट करत होता, ज्याकडे प्रवाशांनी लक्ष वेधूनही त्याने दुर्लक्ष केले.

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न आधीच गंभीर असताना, आता चालकांच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रिल्सच्या वेडापायी एका कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने अशा बेशिस्त चालकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...