अहमदनगर (प्रतिनिधी)
पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळू उपसा थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पारनेर तालुक्यात वाळू माफिया छुप्या पद्धतीने किंवा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूतस्करी करत आहे. नुकतेच तहसिलदार ज्योती देवरे यांचे प्रकरण राज्यभर गाजले त्यांच्यावर भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यात आली. कामात अनियमितता असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली. त्यानंतर तालुक्यात तहसीलदारचा तात्पुरता कार्यभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला. तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.
अवैध वाळू व्यवसायामुळे पारनेर तालुक्यातील अनेक रस्त खराब झाले आहेत. तर वाळूच्या डंपरमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. वा माफियांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले असून, पारनेर तालुक्यात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध वाळू व्यवसाय विरुद्ध तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नाही. प्रशासकीय यंत्रणेकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आवाज दाबला जात असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.