संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील नदीपात्रांतून होणार्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची वक्रदृष्टी पडली असून, उपसा करणार्या ठिकाणी जाऊन कारवाईला सुरूवात झाली आहे. कनोली (ता.संगमनेर) येथील प्रवरा नदीपात्रात होणार्या अवैध उपशावर रात्र गस्तीवर असलेल्या महसूलच्या पथकाने कारवाई केल्यानंतर चिडलेल्या वाळूतस्करांनी थेट पथकावर जेसीबी घातला. परंतु, प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने अनर्थ टळला. सदर घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे.
कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार हे महसूलच्या पथकासह अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्यांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना कनोली शिवारातील नदीपात्रात दोघे जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसले. त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेतले असता सोनू मोरे (पूर्ण नाव माहीत नाही) हा जेसीबी घेऊन पळून जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग केला असता सावळेराम लहानू खेमनर, तुषार हौशीराम खेमनर, विशाल हौशीराम खेमनर, सागर जगताप व लखन उर्फ दीपक मदने व इतर दोन ते तीन जणांनी मोटारसायकल व कार जेसीबीच्या मागे ठेऊन कारवाई करण्यास अडथळा आणला.
दरम्यान, अंभोरे गावाच्या पुढे जेसीबी थांबवला असता वरील सहा जणांसह विशाल आबाजी खेमनर, प्रवीण शिवाजी गवारी, फिरोज शेख व ताहीर शेख (चौघेही रा. अंभोरे) यांनी गैरकायद्याने जमाव गोळा करून सरकारी कामात अडथळा आणला. तसेच आमच्यावर कारवाई केल्यास तुमचे हातपाय तोडू व येथेच जिवंत मारुन टाकू अशी धमकी दिली. याचवेळी सोनू मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पथकाच्या अंगावर जेसीबी घातला. परंतू, प्रसंगावधान राखल्याने पथकातील सदस्यांचा जीव वाचला. याप्रकरणी कामगात तलाठी संतोष शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील दहा जणांवर भारतीय न्यायसंहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे करत आहे.
कठोरात कठोर कारवाई करणार…
संगमनेर शहर व तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर कारवाईसाठी भरारी पथके नेमली आहे. यापुढे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येईल
– धीरज मांजरे (तहसीलदार-संगमनेर)