Monday, May 6, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील वाळूतस्कर दाभाडे, श्रीगोंद्यातील बंटी कोथींबीरे नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

श्रीरामपुरातील वाळूतस्कर दाभाडे, श्रीगोंद्यातील बंटी कोथींबीरे नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीरामपूर व श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करणार्‍या दोन वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्देची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मंजुरी देत याबाबतचे आदेश काढले आहेत. अर्जुन खुशाल दाभाडे (वय 36 रा. वॉर्ड नं. 1, गोंधवणी, श्रीरामपूर), बंटी उर्फ संतोष दत्तात्रय कोथींबीरे (वय 34 रा. साळवणदेवी रस्ता, श्रीगोंदा) अशी स्थानबध्द केलेल्या वाळू तस्करांची नावे आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुका, एमआयडीसी, सोनई, नगर तालुका तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, दरोड्याचा प्रयत्न, साथीदारांसह वाळु चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर सात गुन्हे करणार्‍या अर्जुन दाभाडे याच्या विरूध्द ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे सादर केला होता.

तसेच श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दंगा, धारदार हत्याराने मारहाण, शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी, नदीपात्रातून बेकायदा वाळु उपसा करणे अशा प्रकारचे गंभीर सहा गुन्हे करणार्‍या बंटी उर्फ संतोष कोथींबीरे याच्या विरूध्द ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी अधीक्षक ओला यांच्याकडे सादर केला होता. सदरचे दोन्ही प्रस्ताव तयार करणेकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बिरप्प करमल, संतोष दरेकर व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संभाजी गर्जे यांनी परिश्रम घेतले.

प्राप्त प्रस्तावांची अधीक्षक ओला यांनी पडताळणी करून अहवाल जिल्हाधिकारी सालीमठ यांना सादर केले होते. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रस्तावांची व कागदपत्रांची पडताळणी करून अर्जुन खुशाल दाभाडे व बंटी उर्फ संतोष दत्तात्रय कोथींबीरे यांना नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आदेश पारित करताच अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस अंमलदार रवींद्र पांडे, राम माळी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, सचिन आडबल, रोहीत मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने दोन्ही वाळु तस्करांना तात्काळ ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे जमा केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या