नेवासा |प्रतिनिधी| Newasa
नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवासा व शेवगाव येथे दोन ठिकाणी छापे टाकून वाळूतस्करी करणार्यांकडून 22 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. नेवासा येथे पाच जणांवर तर शेवगाव येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, अशोक लिपणे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे व रणजीत जाधव अशांचे पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सूचना देऊन पथक रवाना केले होते.
10 एप्रिल रोजी पथकाने शेवगाव व नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणार्या इसमांची बातमीदारामार्फत माहिती काढून पंचासमक्ष दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये नेवासा येथे एक डम्पर, एक टेम्पो, वाळू असा 17 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गोरख दत्तू लष्करे, सुहास ज्ञानेश्वर लष्करे (फरार), सागर केशव लष्करे, योगेश उत्तम बोडखे (चौघेही रा. नेवासा) व पप्पू ऊर्फ विश्वास पटारे रा. भालगाव ता. नेवासा (फरार) या पाच जणांवर गुन्हा रजिस्टर नं. 362/2025 बीएनएस कलम 303 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव येथील छाप्यात 5 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात एक ट्रॅक्टर व वाळू जप्त करण्यात आली. यात संतोष प्रभाकर औसरमल व निखील राजेंद्र काकडे (फरार) (दोघेही रा. कोरडगाव ता. पाथर्डी) यांच्यावर गुरनं 321/2025 बीएनएस 303 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.