Friday, July 24, 2026
HomeराजकीयSandeep Pathak : ‘आप’ सोडताच संदीप पाठक यांच्यावर अटकेची टांगती तलवार; दोन...

Sandeep Pathak : ‘आप’ सोडताच संदीप पाठक यांच्यावर अटकेची टांगती तलवार; दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल

दिल्ली । Delhi

राजकारणात ‘वेळ’ किती बलवान असते, याचा प्रत्यय सध्या पंजाबमध्ये पाहायला मिळत आहे. कालपर्यंत आम आदमी पक्षाचे (AAP) चाणक्य मानले जाणारे आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्तीय असलेले राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. त्यांनी ‘आप’ला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताच, पंजाब पोलिसांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे पाठक यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाठक यांच्यावर पंजाबमधील दोन जिल्ह्यांमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचारासारखे अत्यंत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही गुन्हे अजामीनपात्र कलमांखाली नोंदवण्यात आले असून, पंजाब पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी पंजाब पोलिसांचे एक विशेष पथक संदीप पाठक यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी धडकले होते. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच पाठक तिथून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत असून कोणत्याही क्षणी त्यांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संदीप पाठक आणि राघव चड्ढा यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या पक्षांतरानंतर लगेचच सुरू झालेल्या पोलीस कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पंजाब भाजपचे कार्याध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “पंजाबमध्ये आता कायद्याचे राज्य उरलेले नाही. भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल हे पोलिसांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहेत. संदीप पाठक यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर जुने आरोप उकरून काढून गुन्हे दाखल करणे, ही निव्वळ सूडबुद्धी आहे. ही कारवाई म्हणजे मान सरकारची भीती दर्शवते.”

केवळ संदीप पाठकच नव्हे, तर ‘आप’ सोडून गेलेले दुसरे खासदार राजिंदर गुप्ता यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे. पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजिंदर गुप्ता यांच्या मालकीच्या ‘ट्रायडेंट ग्रुप’च्या कारखान्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता छापा टाकला. यावेळी कारखान्यातील कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. ही कारवाई देखील राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दल आणि भाजपने केला आहे.

एकूणच पंजाबचे राजकारण आता अत्यंत खालच्या स्तरावर गेल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला भ्रष्टाचारावर कारवाई केल्याचा दावा सरकार करत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष याला लोकशाहीची हत्या मानत आहेत. संदीप पाठक यांच्यावरील या कारवाईचा पुढील काळात पंजाबच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...