Thursday, May 2, 2024
Homeनगरतुमच्या दहशतीला आम्ही पुरून उरणार; विखे पाटलांवर थोरातांचा हल्लाबोल

तुमच्या दहशतीला आम्ही पुरून उरणार; विखे पाटलांवर थोरातांचा हल्लाबोल

संगमनेर (प्रतिनिधी)

तुम्ही संगमनेर तालुक्यात दहशत माजविण्याकरिता आणि विकास मोडण्याकरिता येता ही वस्तुस्थिती आहे. कुणाला वेगळं वाटत असेल तर जरुर चर्चेला बसण्याची आमची तयारी आहे. कुणावरही खोट्या केसेस दाखल करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, त्यांना जेलमध्ये घालायचे हे सगळे उद्योग चालू आहेत. पण आम्ही पुरून उरणारे आहोत, असा हल्लाबोल माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता केला.

- Advertisement -

वडगाव पान येथे पंचक्रोशीच्यावतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, सौ. दुर्गाताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी. साहेबराव थोरात, सौ. पद्माताई थोरात, सौ. बेबीताई थोरात, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय थोरात, डॉ. दादासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, संतोष हासे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, महेश मोरे, अरुण कुळधरण, रावसाहेब जंबुकर आदींसह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रत्येक गावात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचा कलश करून त्याचे पूजन करण्यात आले.

आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. प्रत्येक दिवशी कामात योगदान दिले. पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटनाच्यावेळी योगदान देणारे, प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता ही चांगली बाब नाही. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते. आणि ज्यांचे काही योगदान नाही ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेला सर्व ज्ञात आहे. आता डाव्या कालव्यातून पाणी सुरू झाले आहे. मात्र फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना वंचित ठेवले जात आहे. अशी दडपशाही व दहशतीचे राजकारण संगमनेर तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही. तुम्ही इकडे येतात ते तालुक्यातील विकास कामे थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, आम्ही राहाता तालुक्यात जातो ते चांगले करण्यासाठी. ३५ वर्षे आपल्या घरात या विभागाची खासदारकीही होती. संगमनेरसाठी काय केले हा मोठा प्रश्न आहे. नगर- मनमाड रस्ता का होत नाही, कोल्हारचा पूल तसाच लटकलेला आहे. खरे विकास कामे करण्याची तिकडे गरज आहे. आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. काही लोक संधी साधूपणे उड्या मारतात. हे जनतेला मान्य नाही. ईडीच्या भीतीने तिकडे गेले कि ते मोकळे राहतात. अत्यंत कमी पाऊस झालेला असताना सत्ताधारी आमदारांच्या तालुक्यात दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले. इतर तालुक्यांमध्ये का नाही ? परंतु हा अस्थिरपणा, असे राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही. पुढील काळ हा काँग्रेसचाच असणार आहे. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण पूर्ण करून घेतले. दुष्काळी भागात पाणी आले हा स्वप्नवत दिवस ठरला. ही दिवाळी अत्यंत आनंदाची असून निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद आहे. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी आली असून निळवंडे धरण व कालवे हे आमदार थोरात यांनी केले इतर लोक श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. या कार्यक्रमासाठी तळेगाव सह पंचक्रोशीतील ज्येष्ठ, नागरिक, , महिला, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या