Tuesday, October 22, 2024
Homeनगरसंगमनेर खुर्दला नाशिक-पुणे महामार्गावर दोन तास ठिय्या आंदोलन

संगमनेर खुर्दला नाशिक-पुणे महामार्गावर दोन तास ठिय्या आंदोलन

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची चार गावांतील नागरिकांची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चार गावांमधील ग्रामस्थांनी ऐन विजयादशमीला सकाळी संगमनेर खुर्द शिवारातून जाणार्‍या नाशिक-पुणे महामार्गावर दोन तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी अनेकांनी वन विभागाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

शुक्रवारी सायंकाळी देवगाव शिवारातील पानोबावस्ती येथील योगिता पानसरे या महिलेवर बिबट्याने हल्ला करत ठार केले होते. त्यामुळे देवगाव, खराडी, निमगाव टेंभी, हिवरगाव पावसा या गावांमधील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. कारण यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीसह महिला ठार झाली होती. असे असताना वन विभागाने हलगर्जीपणा केल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. शनिवारी सकाळी चारही गावांमधील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या मांडला. यावेळी वन विभागाच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या ठिय्या आंदोलनात महिलांची संख्या मोठी होती. कोणत्याही परिस्थितीत बिबट्यांचा बंदोबस्त करा, कारण बिबट्यांमुळे घराबाहेर पडणे सुद्धा अवघड झाले आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

जर वनविभागाने वेळीच लक्ष दिले असते तर योगिता पानसरे या महिलेला जीव गमवावा लागला नसता, त्यामुळे हा सर्व वन विभागाचा हालगर्जीपणा आहे असा गंभीर आरोप अनेकांनी केला. तर काही महिलांना अश्रूही अनावर झाले होते. तुम्ही प्रथम बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहे ते सांगा? यानंतर आम्ही आमचे ठिय्या आंदोलन मागे घेवू या निर्णयावर आंदोलक ठाम होते. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खास पथक बोलविण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आपण बिबट्यांचा बंदोबस्त करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

आमदार थोरातांनी लावला वनमंत्र्यांना फोन…
देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी संगमनेर खुर्द येथील नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार, बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत कार्यवाहीची मागणी केली. मंत्री मुनगंटीवार यांनी त्या बिबट्याला तत्काळ गोळ्या घालण्याचे आदेश दिले.

बेशुद्ध करुन पिंजर्‍यात जेरबंद करणार…
देवगाव परिसरात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नाशिकहून दोन रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर परिसरात अकरा पिंजरे लावण्यात आले असून आणखी पिंजरे लावणार आहे. तसेच वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्याच्या गनद्वारे बिबट्याला बेशुद्ध करून पिंजर्‍यात जेरबंद करण्यात येणार आहे.

  • संदीप पाटील (सहायक वनसंरक्षक-संगमनेर)
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या