Sunday, November 24, 2024
Homeनगरसुसंस्कृत म्हणवून घेणार्‍यांच्या दडपशाहीचा चेहरा राज्याला समजला

सुसंस्कृत म्हणवून घेणार्‍यांच्या दडपशाहीचा चेहरा राज्याला समजला

संगमनेरात घेतली निषेध सभा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणार्‍यांच्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे. भगिनींना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली. ठेकेदारांच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात आता गाठ आमच्याशी आहे. धांदरफळ घटनेमागील ‘मास्टरमाईंड’ शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

धांदरफळ येथील सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला तसेच वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या सभेत ना. विखे पाटील यांनी सडकून टीका केली. तालुका हा सामान्य माणसाचा आहे. कोणाची मालकी यावर नाही. तालुक्यात येण्यासाठी बंदी घालता हीच तुमची लोकशाही आणि सुसंस्कृतपणा का? असा सवाल उपस्थित करून केवळ माफियांच्या जीवावर या तालुक्यात दहशत निर्माण केली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. ती सभा संपल्यानंतर डॉ. सुजय आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा सुनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप करून अचानक गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे साहित्य कसे आले? एवढा मोठा जमाव कसा जमला? समाज माध्यमांमध्ये आमदारांचे बंधू, स्वीय सहायक आणि अन्य पदाधिकारी राजरोसपणे दिसतात अजून कोणते पुरावे पोलिसांना हवेत. या सर्व घटनेची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

डॉ.सुजय यांच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तालुक्याच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. धांदरफळच्या बालेकिल्ल्यात झालेली गर्दीच त्यांना अस्वस्थ करणारी होती. यातूनच परंपरेने दडपशाहीचे हत्यार त्यांनी आता काढले आहे. यापूर्वी सुध्दा कारभारी कडलग यांना झालेल्या मारहाणीचा दाखला देत हिच परंपरा सातत्याने सुरू असल्याची टीका करून आमच्या मतदारसंघात येऊन तुम्ही काहीही बोलायचे, टीका-टिपण्णी करायची तेव्हा लोकशाही, आता इथे तुमच्या विरोधात बोलणार्‍यांवर हल्ले हा तुमचा सुसंस्कृतपणा का? असा प्रश्न विखे पाटील यांनी विचारला.

संगमनेर तालुक्यात चाळीस वर्षांत आला नाही एवढा सहाशे कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने दिला आहे. दुधाचे अनुदान दिले. इथे तर तुमचेच पैसे वर्षभर वापरायचे आणि रिबेट म्हणून देण्याचा धंदा सुरू आहे. यंदा तर ते सुध्दा दिले नाही. आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत महिलांच्या संदर्भात कधीही चुकीचे विधान आमच्याकडून झाले नाही तसा संस्कार आमच्यावर नाही. पण केवळ कोणाच्या तरी वक्तव्याचे खापर आमच्या माथी मारून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. मात्र जनता एवढी दूधखुळी नाही. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध आम्ही केलाच त्यांच्यावर कारवाईची मागणी सुध्दा केली. ते आजही काँग्रेसमध्ये आहेत त्यांना तुम्हीच पक्षातून काढून टाकले पाहिजे, असा पलटवार ना. विखे पाटील यांनी केला.

उमेदवारीवरुन युवकांची घोषणाबाजी…
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी आपल्याला निवडून आणायचा आह, असे म्हणताच उपस्थित युवक कार्यकर्त्यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची मागणी करत ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या