Monday, May 6, 2024
Homeनगरसंगमनेरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ रात्रपाळीच्या पोलिसांचे कामाकडे दुर्लक्ष

संगमनेरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ रात्रपाळीच्या पोलिसांचे कामाकडे दुर्लक्ष

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेरात चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले असताना या चोर्‍यांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलिसांचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

रात्रपाळीत काम करणारे अनेक पोलीस कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या कर्मचार्‍यांकडून शहरात सर्व ठिकाणी रात्रीची गस्तही घातली जात नसल्याचे समोर आले आहे.

संगमनेर शहरात काही दिवसांत छोट्या मोठ्या चोरीच्या घटना होत आहेत. या चोर्‍यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरात चोर्‍या वाढत असताना पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढत असताना रात्री 12 नंतर चोर्‍या होत असताना गस्त घालणार्‍या पोलीस पथकाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

रात्रपाळीची ड्युटी असणारे काही कर्मचारी गस्त घालण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या वरच्या रुममध्ये झोपलेले असतात. ड्युटीची वेळ सकाळपर्यंत असताना काहीजण पहाटेच उठून निघून जातात. पोलीस अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

डीबीची ‘ए’ टीम जागृत असतानाही चोर्‍यांचे तपास लागत नाहीत. चोरी गेलेले अनेक गंठण अद्याप सापडले नाहीत. पोलिसांनी याचा त्वरीत तपास लावावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे. गंठण सापडल्यास महिलांचा आशीर्वाद लाभू शकतो. मात्र चोरी गेलेल्या दागिन्यांचा तपास लागत नाही आणि गोर गरीब महिलांचा त्यांना आशीर्वादही मिळत नाही,अशी पोलीस ठाण्याची अवस्था आहे.

विद्यमान पोलीस निरीक्षकांची बदलीची चिन्हे असल्याने काही कामचुकार पोलिसांनी सुस्कारा सोडला आहे. शहरातील चोर्‍यांचा तपास पूर्णपणे मंदावला आहे. पोलीस कर्मचार्‍यांवर अधिकार्‍यांचे कुठलेही नियंत्रण दिसत नाही. ज्याला जे वाटेल ते तो काम करतो, अशी परिस्थिती पोलीस ठाण्याची आहे. नव्याने आलेले जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी संगमनेरात भेट देऊन पोलीस कर्मचार्‍यांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या