मुंबई | Mumbai
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिंदेसेनेने मनसेला सोबत घेतले. उद्धवसेनेचे चारजणही शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत. शिंदेसेना महापौरपदासाठी ६५ ची मॅजिक फिगर गाठण्याच्या तयारीत आहे. कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवारी बसने एकत्र जाऊन शिंदेसेनेने ५३, तर मनसेने ५ नगरसेवकांचा गट स्थापन केला. यानंतर युतीत सोबत असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी या प्रकरणी चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. शाह-कटशहवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अस्थिरता असेल तिथे भाजपसोबत जाण्याचा विचार होईल पण शिंदेसेनेसोबत जाणार नाही असा पवित्रा त्यांनी जाहीर केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक निर्णय घेऊ शकतात, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो, असे स्पष्टीकरण राजू पाटील यांनी दिले.
केडीएमसीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी… मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिला? अशा आशयाचा प्रश्न विचारला असता सदर राजकीय स्थितीवर भाष्य करताना, ‘नितिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये. कल्याण डोंबिवलीत जे घडले ती पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले मात्र राज ठाकरेंनाही ती भूमिका मान्य नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आले. ही युती करायची होती तर कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची युती नाही करायला हवी होती’, असे सांगताना शिंदेंच्या बाबतीत आमची कडवट भूमिका आहे आणि ती राहील असे राऊत स्पष्टच म्हणाले.
KDMC त सत्तास्थापनेसाठी दोन पर्याय असल्याचे सुचवत, तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असे सुचवत ‘महायुती म्हणून ते एकत्र येऊ शकतात मात्र इतरांना त्यात घुसायचे कारण नाही. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलाय त्यामुळे आता आम्ही यावर अंतर्गत चर्चा करू’, असा इशारावजा वक्तव्यही राऊतांनी केले.
‘त्या’ बैठकीची उद्धव ठाकरेंना माहिती होती
“शिंदे गटासोबत जाण्याच्या प्रस्तावाला आम्ही केराची टोपली दाखवतो. शिंदेंसोबत आम्ही कदापि जाणार नाही. इतर काही पर्याय असतील तर त्याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. पण परस्पर निर्णय कोणी घेणार नाही. श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्याची माहिती उद्धव ठाकरेंनाही होती. त्यांनी ही माहिती मला दिली. पहिल्या दिवासापासून याची माहिती होती. आताही पडद्यामागे काय सुरु आहे याचीही माहिती आहे. अशा प्रकारची कोणतीही युती मराठी माणूस मान्य करत नाही. शिंदेंना धडा शिकवण्यासाठी आम्हाला यश मिळालं. असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्यामुळे मराठी माणूस दुखावला जाईल,” असेही संजय राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




