मुंबई । Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे लवकरच शिंदे गटात सामील होतील, या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्याला आता खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, दानवे हे पक्षातच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक विधान केले होते की, “अंबादास दानवे हे लवकरच आमच्यासोबत दिसतील आणि त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.” सामंत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, संजय राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. राऊत म्हणाले की, “अंबादास दानवे हे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदललेला नाही आणि ते आमच्यासोबतच राहतील. अशा अफवांना कोणताही आधार नाही.” उलटपक्षी, राऊत यांनी प्रतिहल्ला चढवताना उदय सामंत यांच्यावरच निशाणा साधला. “स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे सर्वांना माहीत आहे,” असा दावा करत राऊत यांनी शिंदे गटातील अस्वस्थतेवर बोट ठेवले.
मुंबईतील शिंदे गटाचे काही नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनात जाणार असल्याच्या वृत्तावरही राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी शिंदे गटावर कठोर शब्दांत टीका करताना म्हटले की, “शिंदे सेनेला बाळासाहेब ठाकरे वंदनीय नसून, त्यांना केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचेच आदेश महत्त्वाचे वाटतात. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तरी शिंदे गटाने निषेधाचा एक शब्दही काढला नाही.” राऊत पुढे म्हणाले की, “शिंदे यांची शिवसेना ही भाजपचे ‘अंगवस्त्र’ म्हणून काम करत आहे. एखादी साडी-चोळी पदरात पाडून घेण्यासाठी हे लोक किती दिवस रुसून बसणार?” इतकेच नाही तर, आगामी काळात मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. एका महिला वन अधिकाऱ्याने यावर जाहीर आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. राऊत म्हणाले की, “महाजन यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. जर एका कॅबिनेट मंत्र्याने माफी मागितली असेल आणि ‘नाक घासले’ असेल, तर आता त्या विषयावर पडदा टाकला पाहिजे. ज्या महिलेने बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल गणवेशात असूनही धाडसाने आवाज उठवला, तिचे मी कौतुक करतो. मात्र, आता हा विषय अधिक ताणू नये.”





