मुंबई | Mumbai
मराठी आलीच पाहिजे, मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच खरपूर समाचार घेतला आहे.
“मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात”, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार का?
संजय राऊत पुढे म्हणाले, मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणारच. तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहात का? मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का? हो धरतोय आणि धरत राहणार. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
कैलास गोरंट्यालवर संजय राऊतांची टीका
“देवेंद्र फडणवीस यांचे जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली आहे. ज्यांनी ५० खोके एकदम ओके अशी घोषणा कैलास गोरंट्याल यांनी दिली होती. त्यावेळी ते आमदार होते. यांनी विधानभवनाच्या आवारात विधानसभा सुरु असताना ही घोषणा त्यांनी दिली आणि मग ती देशात पसरली. आता ५० खोके एकदम ओके बोलणारे कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहे. कैलास गोंरट्याल यांनी सांगितले आहे की एका एका मतदार संघात निवडणूक जिंकण्यासाठी १०० कोटी खर्च केले. सरकारी वाहन, पोलिसांच्या वाहनातून पोलिसांचे वाटप सुरु होते. त्यानंतर गोंरट्याल असे म्हणतात की आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार. त्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याल म्हटले आणि आज भाजपात आले. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करु नये”, असे संजय राऊत म्हणाले.
किती काळ तुम्ही उध्दव ठाकरेंमध्ये अडकून पडणार आहात
राहुल गांधी यांनी मोहीम उभारली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही उद्धव ठाकरेंमध्ये अडकून पडणार आहात. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झालेले आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




