Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात

‘त्या’ पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगत असतानाच कर्नाटकने गुरुवारी या तालुक्यात पाणी सोडून पुन्हा डिवचले आहे. महाराष्ट्रातील गावांना अमिषं दाखवून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा कर्नाटकाचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उठलेली असतानाच खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसमाधी घेतली पाहिजे. तसेच बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री तुम्हाला डिवचताय, असे अतिक्रमण याआधी कधीही झाले नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज सरकारच्या तोंडावर थुंकताय, सरकारला आव्हान देताय, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? याच स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली आता शिवरायाचा अपमान होतोय तर तुम्ही शांत का, असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला.

शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, “पालापाचोळा गेल्याने काहीच फरक पडत नाही. एखादा आमदार सोडून गेल्याने काहीच फरक पडत नाही. कधीही निवडणुका घ्या, विजय शिवसेनेचाचच होईल. शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी निवडून दाखवावं. आता त्यांना भविष्य नाही. ४० आमदार गेले तरीही पक्ष तिथेचं आहे. ‘त्या’ गटात सध्या काय सुरु आहे, याची खबरबात माझ्याकडे आहे.त्यांच्यामध्ये अंतर्गत ठिणग्या उडत आहेत. स्फोट होईल तेव्हा वस्तुस्थिती समोर येईल. शिवसेना हाच खरा चेहरा आहे. गट निर्माण करुन कोणी निवडून येत नाही. महाराष्ट्र आमच्या पाठिंशी आहे, असे राऊत म्हणाले.

“गुजरातच्या प्रचारसभेत मोदी हे १०० तोंडाचे रावण आहेत असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले त्यावर रान उठवलं गेलं. देशाच्या पंतप्रधानांना असं रावण संबोधनं मलाही वैयक्तिक पातळीवर पटलेलं नाही. पण मोदींनी याच मुद्द्यावरुन जनतेसमोर अश्रू ढाळले आणि हा गुजरातचा अपमान असल्याचं म्हटलं. मोदींना रावण म्हटल्यावर राज्याचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? म्हणजे मोदींचा झालेला अपमान भाजपाला दिसतो. पण शिवाजी महाराजांचा अपमान दिसत नाही. अशी ही दुटप्पी भूमिका भाजपा घेत आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या