मुंबई | Mumbai
शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूर कार अपघात प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, नागपूर अपघात प्रकरणात बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल, तर लपवाछपवी कशासाठी करत आहात? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. अपघात प्रसंगी गाडी कोण चालवत होतं? गाडी कोणाच्या नावावर आहे? अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरची अदलाबदली केली गेली. हे सर्व रेकॉर्डवर आहे. तसेच आरटीओ ऑफिसरनं नंबर प्लेट का बदलली? अशा प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडवणीस गृहमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा : “भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना….”; रोहितपवारांचा सर्वात मोठा दावा
संजय राऊत पुढे म्हणाले की, आतापर्यंत दुसरा कोणी असता, तर त्याच्या घरापर्यंत पोलीस गेले असते. जर हा विरोधी पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता, तर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून सुद्धा जर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा गाडी चालवत होता, तर मग एफआयआरमध्ये नाव का नाही? जोपर्यंत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. जोपर्यंत या राज्याच्या पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. तुम्ही लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्यामध्ये कोणी नशा केली हे सर्व स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जी गाडी आणण्यात आली आहे. त्या गाडीची नंबर प्लेट गायब आहे. हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय का अशी विचारणाही त्यांनी केली आहे. शिवाय अपघात करणारे सर्वे नेत्याचीच मुलं कशी काय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतूल लोंढे यांनी केली आहे.
हे ही वाचा : अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का?…