मुंबई | Mumbai
राज्य सरकारने शुक्रवारी जनसुरक्षा विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक कोणत्याही संघटनेविरोधात नाही. या विधेयकाने सरकारच्या विरोधात लिहिण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेतलेला नाही असे स्पष्टीकरण देत, उद्धव ठाकरे हे विधेयक न वाचताच विरोध करत आहेत. एक प्रकारे कडव्या, डाव्या विचारसरणीला पाठिंबा देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावर खासदार संजय राऊत यांनी ‘टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास असल्याचे व्हिडिओ आणि फोटो आले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहात. डावी विचारसरणी अमुक आणि तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला हे भारतीय जनता पक्षाने पोसलेलेच डावे होते. आता या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहे
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून शहाणे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत. सत्तेपुढे शहाणपण नसते. मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत. हे सर्व मुळचे शहाणे नाहीत. सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहेत, म्हणून त्यांचे ऐकले आणि छापले जाते, असा टोला राऊतांनी लगावला. डावे, कडवे म्हणजे काय हे फडणवीसांना माहित आहे का, असा सवाल करत राऊतांनी त्यांच्या टीकेचा समाचार घेतला.
महाराष्ट्रातचे गुंड राष्ट्र करुन टाकले
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारत आहे. सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला बाहेर फिरायला भीती वाटते. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावर हल्ला करतील, याचा भरोसा नाही. महाराष्ट्राचे गुंड राष्ट्र फडणवीस यांच्या राज्यात करून टाकले आहे. जसे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवर पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, बनावट पद्धतीने संबंध जोडले गेले. तोच जन सुरक्षा कायदा आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्ट आणि डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता
जगभरात डावी विचारसरणी आहे. चीन, रशिया, युक्रकेनमध्ये डावी विचारसरणी आहे. डावी विचारसरणी ही असू शकत नाही का? असा सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे नाव ऐकले आहे का? नसेल ऐकले तर त्यांचा इतिहास वाचा. त्यांनी भारतात डावी विचारसरणी आणली. पंतप्रधान मोदींनी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा दिल्लीत उभारला ते देखील डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी हातात शस्त्र घेतले होते. फॉरवर्ड ब्लॉक हा त्यांचा पक्ष होता. कॉम्रेड रणदिवे, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्ट आणि डावे होते. संघ आणि भाजपा नव्हता. क्रांतीच्या कार्यात डावे होते. शहीद भगतसिंग डाव्या विचारसरणीचे होते. कम्युनिस्ट होते. सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे आहेत. कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड तारा रेड्डी हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय पूर्वज हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या लढ्यात कुठेही नव्हते. हे जर त्यांना माहित नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





