Thursday, August 13, 2026
HomeनगरSanjay Raut : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा; संजय राऊतांनी...

Sanjay Raut : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा; संजय राऊतांनी का केली मागणी?

शिर्डी । प्रतिनिधी

राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. तब्बल ८० लाखांहून अधिक महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला असून, “हा जनतेच्या पैशांचा अपहार करून मते विकत घेण्याचा प्रकार आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राऊत म्हणाले की, “सरकारी तिजोरीचा गैरवापर करून अपात्र महिलांना पैसे वाटण्यात आले आणि त्याद्वारे मते विकत घेण्यात आली, हे आता सिद्ध झाले आहे. ही लोकशाहीची थट्टा असून ही निवडणूकच रद्द व्हायला हवी. सरकारी तिजोरीची लूट करणाऱ्या या नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत.” हे कलियुग नसून ‘मोदी युग’ आहे, आणि अशा युगात जर ही लूट अधिकृतपणे चालणार असेल तर आम्ही त्याचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करू, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

निवडणूक निकालांनंतर शिवसेनेच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, एखादी निवडणूक हारली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली असे मुळीच नाही. सध्या निवडणुका नसल्यामुळे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही कामाला लागलो आहोत. याच वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, “काही लोक आपली संस्थाने वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपमध्ये गेले. अशा लोकांना कोणतीही विचारधारा नसते; ते केवळ सत्तेच्या हवेनुसार दिशा बदलतात. उद्या केंद्रात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर हेच लोक पुन्हा आमच्या पायाशी लोटांगण घालताना दिसतील.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, विखे पाटील यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. ते भाजपमध्ये तरी किती दिवस टिकतील हा प्रश्नच आहे. ते जेव्हा आमचा पक्ष सोडून गेले, तेव्हाच आम्ही त्यांना राजकीय ‘श्रद्धांजली’ वाहिली होती. भाजपमध्ये सध्या बहुतांश नेते हे आयात केलेले आहेत, त्यामुळे भविष्यात भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष परदेशातील झाला तर नवल वाटायला नको, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेताना, “भाजप स्लो पॉईजन आहे असं म्हणणाऱ्यांना आता पॉईजन काय असते ते लवकरच समजेल,” असा इशारा त्यांनी दिला.

“भाजप हा शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणा पक्ष आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी मातोश्रीवर यावं. शिंदे गटातील काही लोकांना जर आता त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत असेल, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, मात्र काही ठराविक लोकांना पक्षात अजिबात प्रवेश दिला जाणार नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. शेवटी, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी न्यायव्यवस्था आणि यंत्रणांवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव असल्याचा दावा करत, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार याची खात्री असल्यामुळेच जाणीवपूर्वक निकाल लांबवला जात असल्याचा आरोप केला.

ताज्या बातम्या