मुंबई । Mumbai
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस उलटले आहेत. या हल्ल्यात २७ भारतीय जवान शहीद झाले. मात्र अद्याप केंद्र सरकारने कोणताही ठोस प्रतिउत्तर दिलेले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊत म्हणाले, “रोज सरकारकडून केवळ औपचारिक कृती होत आहेत. कुठे पाकिस्तानच्या हाय कमिशनमधील कर्मचारी कमी करणे, तर कुठे २१ पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स बंद करणे. ही सरकारची बदला घेण्याची पद्धत आहे का?” त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली.
संजय राऊत यांनी सरकारच्या विरोधकांवरील कारवाईंचा उल्लेख करत म्हटले, “तुम्ही राजकीय विरोधकांचा बदला घेताना त्यांचे पक्ष फोडता, तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता. पण पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राच्या बाबतीत मात्र केवळ नाड्या आवळण्याच्या गोष्टी करतात. याला बदला म्हणतात का?” त्यांनी पुढे इंदिरा गांधींचा दाखला देत म्हटले, “२७ जवान शहीद झाल्यानंतर प्रतिउत्तर कसे द्यायचे, हे इंदिरा गांधींच्या इतिहासातून शिकावे. त्यांनी केवळ गोष्टी करून दाखवल्या नव्हत्या, तर शत्रूला ठोस उत्तर दिले होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “पंतप्रधान इकडून तिकडे फिरत आहेत, मिठ्या मारत आहेत. याला बदला म्हणत नाहीत. देशाची स्थिती बघून भीती वाटते. शत्रू समोर उभा आहे, आणि आपण केवळ युट्यूब चॅनल बंद करत आहोत. हे युद्धसज्जतेचं नाही, तर गोंधळाचं लक्षण आहे,” असा घणाघात त्यांनी केला. राऊतांनी भाजप आणि केंद्र सरकारवर आरोप केला की, “हे सरकार केवळ विरोधकांवर सूड घेण्याचे काम करत आहे. पण त्यातही आता त्यांना यश येत नाहीये. बारा दिवस उलटले तरी केवळ युद्धसरावाच्या बातम्या येत आहेत. हा बदल्याचा मार्ग नव्हे.”
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरून देखील सरकारवर टीका केली. “ही योजना आता संपुष्टात आली आहे. प्रचारात २१०० रुपये देण्याचे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात आता फक्त ५०० रुपये मिळत आहेत. यामध्ये अजित पवार म्हणतात, ‘मी काही बोललो नाही, कर्जमाफीबद्दलही काही बोललो नाही’. पण सरकार तुमचंच आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात,” असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. ते पुढे म्हणाले, “प्रत्येक मंत्री ‘माझा पैसा’ म्हणतो. एक मंत्री म्हणतो माझ्या खात्याचा पैसा वळवून ‘लाडकी बहीण’ योजनेस दिला. पण तुम्हाला पैसा कशाला हवा? जनतेसाठी पैसे वापरायचे असतात. स्वतःच्या खात्यासाठी नव्हे,” असे स्पष्ट मत राऊतांनी व्यक्त केले.