नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचा थेट आरोप केला. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधींनी निवडणुक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी त्यांची भेट घेत महाराष्ट्रात १६० जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव दिला होता, असे म्हटले आहे. आता या गौप्यस्फोटानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवारांना भेटलेली ती माणसं उद्धव ठाकरेंनाही भेटली होती, त्यांनी आम्हाला 60 ते 65 कठीण जागा जिंकून देण्याचा दावा केला होता, असा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला.
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगात इतके घोटाळे आहे. शरद पवार यांनी मुद्दा मांडला, निवडणुकीपूर्वी लोक भेटले आणि १६० जागा देतो. आम्हाला ही लोक भेटले आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेला आणि विधानसभेला पण हे लोक भेटले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकसभेला आम्हाला यश प्राप्त झाले आहे. तेव्हा पुन्हा ते विधानसभेलाही मिळेल. ते म्हणालेले ६०-६५ जागा कठीण जागा सांगा, आम्ही त्या देऊ. पण आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. पण आता राहुल गांधी यांनी पुरावे दिले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
आम्ही तुम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करु
“आम्ही तुम्हाला त्या ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण त्यांनी इतकेही सांगितले की तुम्हाला जरी हे आवश्यक वाटत नाही तरी समोर जे सरकारमध्ये आहे, त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केले आहे, त्यामुळे तुमचे अपयश आम्हाला दिसतेय, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवाने जे शरद पवार म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी माणसे भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावे असे दिसतेय”, असे संजय राऊत म्हणाले.
ते जबाबदारीने बोलतात
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत. राहुल गांधी यांनी मत चोरीचे जे पुरावे समोर ठेवले आहेत, त्याची शहनिशा अनेक मीडियाने केली. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. अशा निवडणूक आयोगाविरुद्ध इंडिया आघाडीचा लाँग मार्च आहे. आम्ही ज्याला मतदान करतो, ते समजावे, यासाठी व्हीव्हीपॅटची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आहे. पण आता निवडणूक आयोग म्हणत आहे की, हे नसणार मग आम्हाला कसे कळणार आमचे मत कुठे गेले आहे, असा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला.
शरद पवार काय म्हणाले?
“राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे, भाजपाकडून नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले होते. काल माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. “विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची त्यांना गॅरंटी दिली होती”, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.’
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




