मुंबई | Mumbai
सत्ताधाऱ्यांकडून पोलीस यंत्रणेसह हाती असणाऱ्या सत्तेचाही गैरवापर सुरु असल्याचे स्पष्ट वक्तव्य करत शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एका खळबळजनक प्रकरणाकडे माध्यमांसह नागरिकांचेसुद्धा लक्ष वेधले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अद्याप फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी सातारा ड्रग्ज कारखान्याच्या सुत्रधारांना अभय दिल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला आहे.
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना राडा झाला आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. हे प्रकरण चंगलेच तापले आहे. विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. कोणालाही सोडणार नाही असे म्हणत तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुले, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल विचारत राऊत यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील कॅबिनेटमधील एक मंत्री, भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावर प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एका काँग्रेस कार्यकर्त्यावर ठार मारण्यासाठी हल्ला केला गेला आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना?”
राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अभय दिला आहे का?
“मंत्री, मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांनी खून केले किंवा चोऱ्या केल्या, दरोडे टाकले, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अभय दिला आहे का? मंत्र्याचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला जातो, तरी तो सापडत नाही. राज्यातील एक मंत्री बेपत्ता होतो, मी कोकाटेंविषयी बोलतोय. ते ४८ तास सापडत नाहीत, ही पोलिस यंत्रणा आहे की भाजपाची खाकी वर्दीतील टोळी आहे? कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा?” अशी घणाघाती टीका राऊतांनी यावेळी केली.
मग मंत्र्यांचे भाऊ, बाप कसे सुटतात?
“कायदा आणि सुव्यवस्थेवर तुम्ही विधानसभेत भाषण देता की, कोणालाही सोडणार नाही, मग मंत्र्यांचे मुलं मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? साताऱ्यामधील ड्रगच्या कारखान्याचे काय झाले हे देवेंद्र फडणवीस सांगतील का? त्यातील खरे सुत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जवळजवळ गुडघ्यावर बसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जच्या कारखान्याच्या सुत्रधारांना अभय दिला.” असा आरोप संजय राऊतांनी केला.




