मुंबई | Mumbai
तुम्हाला इकेड येण्याचा स्कोप आहे, असेल तर बघा , अशी खुली ऑफर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उद्धव ठाकरे यांना दिली होती. सभागृहात एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही ऑफर दिल्याने सभागृहात आणि सभागृहाबाहेर चर्चेचा विषय ठरली. त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या याच विधानावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डुप्लिकेट लोकांना घेऊन कारभार चालला
देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहे. याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या फडणवीस यांचा कारभार डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अशा लोकांसोबत बसायचे की खऱ्या लोकांसोबत बसायचे याचा विचार त्यांनी आधी करावा असा सल्ला देतानाच त्यांनी डुप्लीकेट शिवसेना म्हणत नाव न घेताच एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला.
फडणवीस टपल्या टिचक्या मारण्यात पटाईत
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहे. याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात चिन्ह आणि नावाबद्दल लढा देत आहे. आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, ही आम्हाला खात्री आहे. फडणवीस यांच्यासोबत जे डुप्लिकेट लोक बसली आहेत, त्यांचा विचार फडणवीस यांनी करावा. सध्या फडणवीस यांचा कारभाव डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे. फडणवीस यांची ऑफर नाही, ह्या टपल्या आणि टिचक्या आहेत. डुप्लिकेट लोकांना वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असे असताना फडणवीस हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑपर देत आहेत. ती वैचारिक दिवाळखोरी आहे.”
राजकारण आणि बहुमत चंचल, अस्थिर असते
2029 सालापर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याचा स्कोप नाहीये, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले. “राजकारण आणि बहुमत फार चंचल, अस्थिर असते हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन दहशतावाविरोधातील युद्ध थांबवतील असे कोणाला वाटले होते का ? आता युद्ध सुरूच आहे, तर ५६ इंचाची छाती असलेले पंतप्रधान हे लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानावरती तिरंगा फडकावूनच शांत बसतील असे आम्हाला वाटले होते, अशाच त्यांच्या गर्जना, आरोळ्या होत्या. पण असे झाले का, आज त्या विषयावर आवाज बंद आहे. असे म्हणत राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही” असे राऊत म्हणाले.
उध्दव ठाकरे यांचा दिल्ली दौरा
“दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी फोनवरून संपर्क साधला. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. इंडिया आघाडीतील अनेक पक्ष अस्वस्थ आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबद्दल दिशा ठरवण्याची गरज आहे. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल हाचलाची सुरू आहे. सध्या १९ तारीख ठरवली आहे. पण, ही तारीख कितीजणांना सोयीची आहे, हे पाहावे लागेल. इंडिया आघाडीची बैठक नक्कीच होणार आहे. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांचा दौरा जाहीर करू. संसदेच आंदोलन, राष्ट्रीय प्रश्न याविषयावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल चर्चा करणे मुर्खपणाचे आहे,” असे राऊत यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





