मुंबई । Mumbai
आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. एकीकडे हा विजय भारतीयांसाठी आनंदाचा क्षण ठरला असला, तरी दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळला जात असल्याने देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या सामन्यावर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशवासीयांची भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी भावना होती. मात्र, सरकारने बीसीसीआयला (BCCI) बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याने हा सामना पार पडला. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळून त्यांना आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात. पाकिस्तान जिंकला किंवा हरला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यांवर आम्ही थुंकतो.”
संजय राऊत यांनी या सामन्यामागे असलेल्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, भारत-पाकिस्तान सामन्यावर तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या जुगारातून अधिकृतपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला १००० कोटी रुपये मिळाले, तर साधारण २५ हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेले. “हाच पैसा आता आपल्याविरुद्ध वापरला जाईल,” असा दावाही राऊत यांनी केला. त्यांनी थेट पैशांसाठी हा सामना खेळला गेल्याची टीका केली.
सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळल्याबद्दल होत असलेल्या कौतुकावरही राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “हस्तांदोलन केलं नाही, याचं भाजपवाले कौतुक करत आहेत. देशाची जनता मूर्ख आहे का? देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, अनेक लोक शहीद झाले… आणि तुम्ही हस्तांदोलन केलं नाही, याचं कौतुक करताय? हस्तांदोलन न करणं हे काही पहलगाम हल्ल्यावरचे उत्तर झाले का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
खेळाडूंच्या भावनांचा आदर करत सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने तो विजय पहलगाम हल्ल्यातील मृतांना समर्पित केला, तर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला. या कृतीवरून खेळाडूंची इच्छा नसतानाही सरकारमुळे सामना खेळला गेल्याचे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केल्याचे राऊतांनी सांगितले. एकूणच, हा सामना केवळ एक खेळ नसून, दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांवर भाष्य करणारा ठरला आहे.




