मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर हे आज मंगळवारी (ता. 17 जून) भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास बडगुजर यांचा हजारो कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यामुळे मोठ्या शक्तीप्रदर्शनासह बडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्या प्रवेशावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर म्हणाले, “ते आमच्या पक्षात नाहीत. जे आमच्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर आम्ही का मत व्यक्त करावे? मी त्यावर मत व्यक्त करणार नाही”. नाशिकमधील शिवसेना नेते, पदाधिकारी पक्षासोबतच आहे. नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत असे ही म्हणाले की, आमच्या पक्षातून त्यांना दूर करण्यात आले. त्यामुळे आता ते कोणत्याही पक्षात जाऊद्यात, त्याबाबत काहीही चर्चा होऊद्या. ते आता आमच्या पक्षात नाही, त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. ज्यांना जायचे होते, ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचे होते, त्यांना दूर केले. आता फक्त नावे येत आहेत, चर्चा सुरू आहेत, ही फक्त हवेतील पंतगबाजी आहे. पक्षाला अडचणीचे ठरणाऱ्या माणसांना पक्षापासून दूर करण्यात आले आहे, असे यावेळी राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
यावेळी त्यांनी बबन घोलप यांच्यावरही टीका केली, ते म्हणाले, बबनराव घोलप सध्या फिरता रंगमंच आहेत. त्यांचे पुत्र योगेश घोलप पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी संघर्ष करून आम्ही जागा मिळवली होती. ज्या नावांची चर्चा होत आहेत, त्यांनी आज सकाळीच माझ्यासोबत संपर्क साधून आपण पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना काहीही अर्थ नाही. त्यामुळे पक्ष प्रवेश होऊ द्या, मग याबाबत बोलू, असे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





