Thursday, May 2, 2024
Homeनगरसंत तुकारामांचा परिवर्तनवादी विचारच समाजाला तारू शकेल - पोपटराव पवार

संत तुकारामांचा परिवर्तनवादी विचारच समाजाला तारू शकेल – पोपटराव पवार

पारनेर (तालुका प्रतिनिधी)-

संत तुकाराम महाराजांनी समाज मनाचे प्रतिबिंब असलेले साहित्य निर्माण केले. पर्यावरण, पाणी, आणि समाज यांचा त्रिवेणी संगम त्यांनी

- Advertisement -

आपल्या संत साहित्यातून साधला. त्यामुळे संत तुकारामांचा परिवर्तनवादी विचारच समाजाला तारू शकेल, असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पारनेर व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथे आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार वितरण त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मसाप पारनेर शाखेचे अध्यक्ष तथा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश औटी, मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, शिक्षक समितीचे राज्य उपनेते रा. या. औटी, उद्योजक बापूसाहेब भूमकर, कैलास गाडीलकर, पत्रकार विठ्ठल लांडगे, पद्माकर भालेकर, संभाजी औटी, नगरसेवक साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख, दिलीप भालेकर, पुरुषोत्तम सदाफुले, दिगंबर ढोकले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.संजय कळमकर म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार साहित्यिक कलावंतांना सदैव प्रेरणा देत राहील. जनमानसाच्या शरिरात जसे रक्त वाहते. तसेच संत तुकाराम महाराजांचे साहित्य वाहते. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, संत तुकारामांची पगडी व तुकाराम गाथा भेट देऊन डॉ. संजय कळमकर यांना श्री संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बापूसाहेब भूमकर, कैलास गाडीलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीसंत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दिनेश औटी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय वाघमारे यांनी आभार मानले.

संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार वितरणानंतर ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन झाले. साहेबराव ठाणगे, सतीश सोळंकुरकर, अरुण पवार, नारायण पुरी, भारत दौंडकर, राजेंद्र वाघ यांनी या कवी संमेलनात सहभाग नोंदवला. भारत दौंडकर यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेने या कवी संमेलनाचा समारोप झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या