बीड | Beed
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने उलटले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना अमानूष मारहाणीचे फोटो दोषारोपत्रातून समोर आले होते. हे फोटो पाहताच लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली. हे फोटोपाहून अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता देशमुखांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आला आहे. यात देशमुखांची हत्या कशी झाली याचा विस्तृत अहवाल देण्यात आला आहे. या अहवालात त्यांच्या शरीरावर नराधमांनी कसे वार केले, याची सगळी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून आरोपींच्या मारहाणीत देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे. देशमुखांचे शरीर मारहाणीनंतर काळे-निळे पडले होते. त्यांच्या डोळ्याखालील देखील काळे व्रण होते, असे धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. नाकातून रक्त येई पर्यंत मारहाण करण्यात आल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. असंख्य जखमा आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे देशमुखांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच देशमुखांच्या हनुवटी, कपाळ दोन्ही गालांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. तसेच त्यांच्या पोटावर जखमा, नाकातून रक्त, छाती, गळ्यावर जखमा, बरगड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण, डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपरा, मनगट, हाताच्या मुठीवरही गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत. जवळपास दीड-दोन तास मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची पाठ काळी निळी पडली होती. त्यांच्या बरगडीलादेखील जखमा आहेत. बरगड्यादेखील तुटल्या होत्या. नराधमांनी केलेल्या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरात दोन ते अडीच लिटर रक्त गोठले होते. अशी माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. या अहवालावरुनच संतोष देशमुख यांना किती निर्घृणपणे मरण देण्यात आले हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा