बीड | Beed
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट झाला आहे. .संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी वकील जे बी.शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. वाल्मिक कराडवर केवळ केवळ आवादा कंपनीच्या २ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्ह्याची नोंद होती. मात्र,हेच खंडणी प्रकरण पुढे जाऊन खूनापर्यंत पोहोचले.
खंडणी आणि खून प्रकरण दोन्हीही संलग्न असल्याने वाल्मिक कराडवर (Walmik Karad) हत्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही करत होते. यानंतर आज (मंगळवार) वाल्मिक कराडवर हत्येच्या कटाचा आरोप करून ‘मकोका’ लावण्यात आला. वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला केज न्यायालयात (Kej Court) हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी खंडणी प्रकरणात आणखी चौकशी करायची आहे असे सांगून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.परंतु न्यायालयाने मागणी फेटाळून लावत वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येची (Murder) चौकशी करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने आणि गुन्हे अन्वेषण विभागाने वाल्मिक कराडवर हत्येच्या कटाचा ठपका ठेवून त्याच्या चौकशीकरिता एसआयटी कोठडी मागितली. त्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर ३०२ च्या गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली. या कारवाईमुळे वाल्मिक कराडला मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांनी वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी होती. त्यानंतर आज मंगळवारी वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.यावेळी दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. त्यानंतर कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
कराडवर मकोका लावल्यानंतर आमदार सुरेश धस काय म्हणाले?
भाजपचे आमदार सुरेश धस मुंबईत बोलताना म्हणाले की, या प्रकरणातील गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे की आणखी कोण आहे, हा मुद्दा नव्हता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा होता. संतोष देशमुखच्या हत्येनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कोणताही दोषी सुटणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती . देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने आता आपले काम दाखवण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा विश्वास धस यांनी व्यक्त केला.
परळीत कराड समर्थक आक्रमक
वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खुनाचा गुन्ह्या दाखल झाल्याने परळीत वाल्मिक कराड याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी परळी बंदची हाक दिलेली आहे. केजमधून जशी कराडवर मकोका लागल्याची बातमी आली, तसे परळीच्या चौकाचौकातील दुकाने बंद करण्यात आली.