बीड | Beed
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात कराडचा ताबा एसआयटीने घेतला असून आज त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी या हत्येच्या दिवशी सध्या मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये संभाषण झाल्याची माहिती कोर्टात दिली.
तसेच कराड, घुले आणि चाटे या तिघांमध्ये फोनवरून दहा मिनिटे संभाषण झाल्याचे विशेष तपास अधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्यानंतर एसआयटीने कोर्टाकडे १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसांची म्हणजे दि.२२ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
तपास अधिकारी कोर्टात नेमकं काय म्हणाले?
एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर कोर्टात म्हणाले की, “हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. ९ डिसेंबरला केज तालुक्यात संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्याआधी ३ ते ३.१५ दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यादिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते”,अशी माहिती त्यांनी दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती आहे .
तसेच सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये ९ डिसेंबरला फोनवरून काय बोलणे झाले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला १० दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली. तर वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी न्यायालयात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच मकोका कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. याशिवाय इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली.त्यामुळे आता यावर न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
फरार कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात?
या प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये काही परस्पर संबंध आहेत का? तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळेला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहितीही एसआयटीला घ्यायची आहे. सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहितीही एसआयटीला घ्यायची आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी कराड यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीकडून करण्यात आली.
कराडचे वकील नेमकं काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या वाल्मिक कराड याची एसआयटीने बीड न्यायालयाकडे दहा दिवसांची कोठडी मागितली. त्यावर आरोपी कराडचे वकील ठोंबरे म्हणाले की,कोणताही पुरावा नसतांना कराड यांना अटक करण्यात आली. तसेच अटकेत असलेल्या इतर आरोपींनीही त्यांचे नाव घेतलेले नाही.वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची अटक बेकायदेशीर आहे”,असा युक्तिवाद कराड यांच्या वकिलांनी केला.
न्यायाधीशांचा तपास अधिकाऱ्यांना प्रश्न
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले की,फक्त फोन कॉलवर आरोपीला दोन्ही गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे का? हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का? असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. तसेच हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का? असा सवाल देखील न्यायाधीशांनी विचारला.