मुंबई । Mumbai
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्रातून सर्वात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली असून आका हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.
वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं उलगडा झाल्यानंतर आता त्याचे पाय आणखीन खोलात जाणार आहेत. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
“आरोपपत्रात वाल्मिक कराड याचे नाव आल्याने मला आश्चर्य वाटत नाही. अमानूष पद्धतीने बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. या व्यक्तीची हिंमतच कशी झाली? यांना अमानुष वागण्याचा अधिकार कोणी दिला?,” असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
“राज्याची दोन लोकांनीच बदनामी केली आहे. कारण परळी, बीडचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांनी राज्याची वाट लावली आहे. वाल्मिक कराड याच्या मागे कुणी तरी असल्याशिवाय तो इतका मोठा गुन्हा करूच शकत नाही,” असाही दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “देशमुख कुटुंबाला खूप मोठी किंमत मोजावी लागली. अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. जर तो राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? यांनी दिल्लीशी संपर्क साधला का? केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का?,” असा देखील सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.