Sunday, May 19, 2024
Homeजळगावसरस्वतीमाँ...

सरस्वतीमाँ…

आयुष्यातल्या सर्वांत दुःखद दिवसांमधील एक दिवस म्हणून आजच्या दिवसाचा उल्लेख करावा लागेल. आज माझी सरस्वती माँ आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. हृदय अत्यंत शोकाकूल झालं आहे. त्यांच्याविषयी किती आणि कोणकोणत्या आठवणी सांगू ? लतादीदी या स्वरसम्राज्ञी होत्या. स्वरसरोवरातील राजहंस होत्या. परिपूर्णता हे त्यांच्या गाण्याचं दुसरं नाव. गाण्यातील सिद्धी कशी प्राप्त होते, याचं लतादीदी हे उत्तम उदाहरण होतं. नजर रोखलेल्या तिरंदाजाचा तीर सपकन लागावा तसा त्यांचा सूर लागतो. जगात देव आहे की नाही, हे कोणी पाहिलेलं नाही. पण, लतादीदींच्या रुपानं मला तो भेटला. या मंत्रभारल्या दिव्य स्वरांची मोहिनी चिरंतन काळ राहणारी आहे.

स्वतःला ‘भाग्यवंत’ म्हणवून घेण्याचे क्षण अनेकांच्या आयुष्यात फार कमी वेळा येतात. पण आपण सारे एका गोष्टीसाठी आयुष्यभर स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे, ती म्हणजे साक्षात सरस्वतीदेवी असलेल्या लतादीदींचा अमोघ स्वर आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. त्यातही मी स्वतःला अत्यंत नशीबवान मानतो की मला त्यांच्यासोबत गाण्याचं भाग्य लाभलं. याबद्दल मी परमेश्वराचे शतजन्म आभार मानत राहीन. ज्यांच्याविषयी बोलायचं झालं तर किती बोलू आणि किती नको व्हावं, अशी फार थोडी माणसं आपल्या आजुबाजूला असतात. ज्यांनी आपल्या कर्तृत्त्वाने गगनाची उंची गाठली आहे आणि तरीही त्यांचे पाय सामान्यांप्रमाणेच जमिनीवर आहेत, अशा माणसांच्या बाबतीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव आदराने अग्रस्थानी घ्यावं लागेल. सार्‍या जगभरच्या रसिकांनी जीव ओवाळून टाकूनही ज्यांनी आपल्यातील साधेपणा आणि माणूसपण निष्ठेने जपलं, अशा लतादीदी. साक्षात सरस्वती मां ! त्यांचं आजवरचं कर्तृत्व आणि त्यांच्यातील स्वभावधर्म पाहिल्यानंतर साक्षात सरस्वतीलाच भेटल्याचा आनंद होतो.

लहानपणापासून ज्यांच्या गाण्याच्या स्वरांवर आपले कान तयार झाले, त्यांच्याबरोबरच गाण्याची संधी मिळेल, असं वाटलंही नव्हतं. पण, परमेश्वरकृपेने आणि दीदींच्या प्रज्ञेने ती संधी दिली आणि माझ्या आयुष्याला, कारकिर्दीला एक वेगळं उजाळ्याचं वैभव प्राप्त झालं.

- Advertisement -

लतादीदी या स्वरसरोवरातील राजहंसी होत्या. परिपूर्णता हे त्यांच्या गाण्याचं दुसरं नाव होतं. गाण्यातील सिद्धी कशी प्राप्त होते, याचं लतादीदी हे उत्तम उदाहरण होतं. नजर रोखलेल्या तिरंदाजाचा तीर सपकन लागावा तसा त्यांचा सूर लागतो. ही एक प्रकारची दैवी देणगीच. या वरदानाला साथ लाभली ती अफाट रियाजाची आणि अभ्यासाची. त्यामुळेच हा स्वर विश्वव्यापी ठरला. सार्‍या जगातील रसिकांचं निरातिशय प्रेम त्यांच्या स्वरांना लाभलं. दीदींचं गाणं आणि त्यांचा अवीट सूर हे सारं काही अद्भूत होतं.

संगीतकार जयदेव यांचा सहाय्यक म्हणून काम करत असताना लतादीदींना जवळून पाहण्याचा योग आला. पण, त्यावेळची त्यांची भेट म्हणजे एक जुजबी योगच होता. त्यानंतरच्या काळात ङ्गमेरा रक्षकफ या चित्रपटाचं संगीत संगीतकार रवींद्र जैन करत होते. त्यावेळी मला त्यांच्याशी जवळून ओळख करुन घेण्याची संधी मिळाली. मी एक गायक आहे, अशा शब्दात रवींद्र जैन यांनी माझी त्यांच्याशी ओळख करुन दिली. खरंतर त्यांच्याशी परिचय होताना मी काहीसा हबकलो होतो. पण, दीदींनी माझी आपुलकीने सविस्तर चौकशी केली. त्यावेळी मी कोल्हापूरचा असल्याचं कळल्यानंतर त्यांना माझ्याविषयी अधिकच आपुलकी वाटू लागली. त्यांनी माझ्या गाण्यांच्या कॅसेट्स आणायला सांगितल्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांना माझ्या गाण्याबद्दल सांगितलं. हा खूप चांगला गातो, असं सांगितलं. खरे पाहता ही माझ्या कारकिर्दीला मिळालेली सुंदर कलाटणीच होती. त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचं माझ्या आयुष्यात एक अढळ स्थान आहे. त्याविषयी शब्दांत सांगता येणं खरोखरच अवघड आहे. काही भावना अव्यक्त असतात तसं काहीसं हे आहे.

मी लतादीदींबरोबर पहिलं द्वंद्वगीत ‘क्रोधी’ या चित्रपटासाठी गायलं. ‘चल चमेली बाग मे’ असेे त्या गाण्याचे बोल होते. त्या गाण्याचं रेकॉर्डींग त्यांच्याबरोबर होणार आहे, या कल्पनेनेच मी खूप घाबरुन गेलो होतो. पण, लतादींदींनी माझ्याशी सहजपणे बोलून ती दूर केली. त्या म्हणाल्या, ‘तू असाच गा, तसाच गा’असं तुला आजपर्यंत अनेकांनी सांगितलं असेल. पण, तू घाबरु नकोस. तू तुला हवं त्या पद्धतीने गा. समोर कितीही मोठा कलाकार असला तरी घाबरायचं नाही. संगीतकाराने आपल्याला जी चाल सांगितली आहे तिला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. इतर कोण काय सांगतं यापेक्षा गाणं काय मागतं याकडे लक्ष द्यायचं.फ त्यांच्या या बोलण्यामुळे मी निश्चिंत झालो. मनावरचं दडपण सरलं आणि हे गाणं छान रेकॉर्डिंग झालं. पुढं जाऊन ते हिटही झालं. या गाण्याच्या निमित्तानं दीदींकडून मिळालेली शिकवण लाखमोलाची ठरली. जणू मला त्यांनी एक मूलमंत्रच दिला. पुढील काळात नंतर मी त्यांच्याबरोबर अनेक गाणी म्हटली.

वेगवेगळ्या भाषेतील गाणी गाणार्‍या लतादीदी म्हणजे गाण्यातील पूर्णबिंदू आहेत. माझ्याकडे असंख्य ध्वनीफिती आहेत. पण, त्यातील 98 टक्के ध्वनीफिती या दीदींच्याच आहेत. आयुष्यात सुख-दु:ख अडीअडचणीचे प्रसंग येत असतात. पण, अशा प्रसंगात दीदींच्या गाण्यामुळे मी रिलॅक्स होतो. दीदींकडून नेहमीच काही ना काही चांगलं शिकायला मिळालं. त्यांच्या प्रत्येक गाण्यात अचूकतेचा, परिपूर्णतेचा ध्यास होता. आपला सूर कसा लागतो आहे, गाण्यातील शब्द कसे लागत आहेत, उच्चारातील भावना नीट येतात की नाही, इत्यादी गोष्टींकडे त्यांचं नेहमीच लक्ष असायचं. गायक म्हणून समृद्ध होण्यासाठी दीदींसारखं विद्यापीठ असणं खूप गरजेचं असतं.

कलावंत म्हणून लतादीदी थोर होत्याच. पण, माणूस म्हणूनही त्या श्रेष्ठ होत्या. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्याची त्या आस्थेवाईकपणे चौकशी करत. त्यांचा चेहरा वरकरणी गंभीर असला तरी त्यांच्यामध्ये एक अस्सल विनोदबुद्धी होती. त्यांच्या बोलण्यातून अनेकदा त्याची प्रचिती यायची. गाण्याइतकाच त्यांचा स्वभावही मधुर होता. मला आठवतंय, ‘लेकीन’ या चित्रपटाची निर्मिती लतादीदींनी केली होती. त्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटात ‘सुरमयी शाम’ हे गीत मी गायलं आहे. हे गाणं खूप गाजलं. ते लोकप्रिय होण्यामागेही लतादीदींचीच प्रेरणा आहे. या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं आहे. तालमीनंतर गाणं प्रत्यक्ष रेकॉर्ड करताना समोर लतादीदी बसल्या होत्या. त्यामुळे मला जास्तच टेन्शन आलं होतं. आपलं गाणं कसं होतं आणि त्यामुळे दीदींना काय वाटेल, याचं ते टेन्शन होतं. त्यांच्या ते लक्षात आलं असावं. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, सुरेश, मला फक्त इतकंच सुचवायचं आहे की, या गाण्यातील ‘साँस’ हा शब्द अशा पद्धतीने उच्चारला पाहिजे की त्यामुळे त्यातून श्वास घेतल्याची जाणीव होईल.फ त्यांच्या या वाक्याने माझ्या मनावरचं टेन्शन कमी झालं आणि त्यांना हवं होतं तसं गाणं माझ्या कंठातून उमटलं. त्यांच्याबरोबर अनेक गाणी मी गायली. त्यामध्ये ङ्गमेघा रे मेघा रेफ, ‘मेरी किस्मत मे तू नही शायद’ ‘इन हसी वादियो में’, ‘ये आँखे देखकर’, ‘माझे रानी माझे मोगा’, ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’अशी असंख्य गाण्यांचा उल्लेख करता येईल. हे सर्व माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. मी ते कधीही विसरु शकणार नाही.

दीदींनी आपल्या सहगायकाला नेहमीच सांभाळून घेतलं. एखादा गायक नवखा असेल तर त्या त्याला प्रोत्साहित करत. त्यामुळे त्याचं मनोबल वाढतं. मी दीदींचा निस्सीम भक्त असून त्यांच्या गाण्याचा पुजारी आहे. धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मी या क्षेत्रात यशस्वी झालो, त्याचं बरंचसं श्रेय लतादीदींना जातं. परमेश्वर कोणीही पाहिलेला नाही. पण, लतादीदी यांच्यासारख्या गानसरस्वतीच्या रुपाने तो मला भेटला, असं मी मानतो. या परमेश्वराचं दर्शन घेऊन माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याचं सार्थक झालं आहे. आपण ज्या व्यक्तीच्या सहवासात वावरत असतो त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावरही कळत-नकळतपणे होत असतो. लतादीदींसारख्या थोर व्यक्तिमत्त्वामुळे माझ्यावरही सुरेल संस्कार झाले आहेत. आयुष्यभर पुरतील, असे हे संस्कार आहेत.

जवळपास 15 ते 18 वर्षे दरवर्षी लतादीदी यांनी मला पद्मश्री पुरस्कार मिळावा याकरिता राष्ट्रपतींना पत्र लिहिली होती. अखेर त्यांची ही प्रखर इच्छा पूर्ण झाली. अशी ही सरस्वतीमाँ आज आपल्याला सोडून गेली आहे. याचं दुःख किती आणि काय सांगावं?

सुरेश वाडकर

प्रख्यात गायक

(शब्दांकन ः स्वाती देसाई)

- Advertisment -

ताज्या बातम्या