Friday, November 22, 2024
HomeनाशिकSATANA : शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक- शरद पवार

SATANA : शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक- शरद पवार

सटाणा । प्रतिनिधी Satana

भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, उद्योगपतींना सोळा लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देणारे मोदी सरकार शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यासाठी प्रयत्न करीत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सद्यस्थितीत देश संकटातून जात असून प्रामुख्याने शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन येथे बोलतांना केले.

- Advertisement -

धुळे लोकसभा मतदार संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शहरातील पाठक मैदानावर आयोजित सभेत बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न ज्वलंत असल्याचे स्पष्ट करीत, केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता निर्यात बंदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या देशातील सरकारवर टीका करताना सर्वसामान्य जीवन जगत असलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यासह द्राक्ष-डाळिंब उत्पादन करणारा शेतकरी देखील अडचणीत असल्याचे पवार यांनी सांगितले.

गांधी-नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने अनेक वर्षांपासून देश चालला आहे. मात्र देशाची लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून देशातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी बोलतांना केला.

स्वातंत्र्योत्तर कालावधीत काँग्रेसने काय केले? असा प्रश्न उपस्थित करणार्‍या मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना आयात करणारा देश विविध क्षेत्रात निर्यात करण्यापर्यंत वाटचाल झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना देशाचे संरक्षणमंत्री करण्यात नाशिक जिल्ह्यातील जनतेचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करीत, भाषणात पवार यांनी बागलाणचे माजी आमदार स्व. पंडितराव धर्माजी पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा येथे सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला होता.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी आमदार दीपिका चव्हाण, डॉ. शोभा बच्छाव, यशवंत गोसावी, सक्षणा सलगर, निलेश कराळे आदींची भाषणे झाली.

सभेस माजी खासदार बापू चौरे, डी एस अहिरे, रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, जयंत दिंडे, लालचंद सोनवणे, यशवंत पाटील, राजेंद्र भोसले, मेहबूब शेख, किशोर कदम, प्रकाश देवरे, राहुल पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुकवासीय उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियंका खैरनार यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या