अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. यानूसार आता सर्व शाळांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा संघ समिती तयार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या संघाच्या माध्यमातून संबंधीत शाळेच्या गुणवत्तेसह भौतिक सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने 1 ऑक्टोबरला काढण्यात आले आहेत. यात शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे. शाळेतून मिळालेले ज्ञान, संस्कार व मूल्यांवरच विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खासगी शाळांतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन, समाजकारण, राजकारण, संशोधन, व्यापार, शेती, उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे राज्यभरात दिसून येते. यासोबतच राष्ट्र उभारणीसाठीही योगदान देत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खाजगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व शाळांमध्ये (इयत्ता 1 ली ते 12 वी) शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे व कार्यसूची निश्चित करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.
संघ स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे
यात संघाचे नाव आणि संघ समितीची रचना यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी (पुरुष/स्त्री) राहणार आहेत. तसेच सचिवहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक-प्राचार्य. कोषाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी तर सदस्य : स्थानिक व नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी आणि सल्लागार सदस्य शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक असणार आहेत. संबंधीत संघाचे सदस्य हे संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी (ऑनलाईन /ऑफलाईन) करून संघाचे सभासदत्व घेऊ शकेल. याबाबतची नोंदणी प्रत्येक शाळेत शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करता येणार आहे. या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात येणार आहे.
संघाचे अपेक्षीत कार्य
शाळेच्या गुणवत्ता वाढीबरोबरच स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती, सौंदर्याकरण, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक व शाळेसाठी आवश्यक इतर विविध सुविधा उपलब्ध करून देणेसाठी मार्गदर्शन व सहकार्य. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम (वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, परसबाग निर्मिती,पाणी संवर्धन) राबविण्याकरिता शाळेस मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य, प्रयोग सामग्री उपलब्ध करून देणे. शालेय विद्यार्थ्यांकरिता माजी शिक्षक, तज्ज्ञ, विद्यार्थ्यांची व्याख्याने/कार्यशाळा यांचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, उच्च शिक्षणाच्या संधी, परदेशातील शैक्षणिक पर्याय याबद्दलची माहिती देणे, विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीत वाढ, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत, शारीरिक शिक्षण व विज्ञान उपक्रमात सहकार्य, रोजगार कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, डिजिटल साक्षरता कार्यक्रम यासंदर्भात सहयोग देणे. शाळेत शिकलेल्या आठवणी जपणे, शाळेशी नाते घट्ट ठेवणे, गावाशी/मातीशी संबंध दृढ करणे. शाळेबद्दल ऋण व्यक्त करणे, शाळेचा वर्धापन दिन साजरा करणे, माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करून शाळेतील तत्कालीन व सध्याच्या शिक्षकांचा सन्मान करणे. आपल्या शाळेचे महत्त्व पालकांना व ग्रामस्थांना समजावून सांगणे. माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माजी विद्यार्थ्यांकडून शक्यतो थेट रोख रक्कम स्वीकारू नये. त्याऐवजी शाळेला आवश्यक असणार्या सुविधा माजी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून घ्याव्यात. माजी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा व इतर बाबींचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डवर लावावा. तसेच त्याचे आर्थिक विवरण अहवाल शाळेत जपून ठेवावेत. शैक्षणिक प्रगती करणार्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी शिष्यवृत्ती निधी निर्माण करणे. गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती देता येणार आहे.
अहिल्यानगरच्या कामाची दखल
शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेऊन माजी विद्यार्थी शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असतात. या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी विविध प्रकारे मोलाचे योगदान करीत असतात. अशाप्रकारची उदाहरणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आढळून आली आहेत.




