Thursday, May 2, 2024
Homeनगरशाळांमध्ये 100 दिवस ‘वाचन अभियान’

शाळांमध्ये 100 दिवस ‘वाचन अभियान’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी, तसेच त्यांच्यातील जिज्ञासू, कल्पकता आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, यासाठी राज्यभरातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 100 दिवसांकरिता ‘वाचन अभियान’राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचन हे आनंददायी आणि उत्सुकता वाढविणारे व्हावे, यासाठी शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहभागातून या अभियानांतर्गत विविध उपक्रमांना अंजाम दिला जाणार आहेत.

- Advertisement -

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक एम. डी. सिंह यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या मदतीने हे अभियान राबविले जाणार आहे. त्यात बालवाटिका आणि इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. जानेवारी ते एप्रिल दरम्यान होणार्‍या या अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी आठवडानिहाय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यात वर्गातील वातावरण आनंददायी राखण्यासह विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे, गोष्टीचा शनिवार, रीड अलाऊड अशा मोबाईल उपयोजनांच्या वापराबाबत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन, वस्तीस्तरावर वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम, वाचन मेळावे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आदी उपक्रम राबवले जातील. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, महापालिकेचा शिक्षण विभाग अशा स्तरांवर उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या