Monday, May 6, 2024
Homeजळगावमनपा पदाधिकार्‍याच्या लॉनसह चार मंगल कार्यालये सील

मनपा पदाधिकार्‍याच्या लॉनसह चार मंगल कार्यालये सील

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे.

- Advertisement -

लग्नकार्यासाठी 50 व्यक्तींची परवानगी असतांना मोठ्या प्रमाणात वर्‍हाडींची गर्दी होत आहे. त्यामुळे रविवारपासून मनपा प्रशासनातर्फे कारवाईची मोहीम सुरु केली आहे. सोमवारी मनपाचे पदाधिकारी यांच्या लॉनसह शहरातील चार मंगलकार्यालये सीलची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीसांनी केली.

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्याबाबत तसेच नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना दिली जात आहे. तरीदेखील नागरिकांकडून पालन केले जात नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे.

मंगल कार्यालयांना केवळ 50 व्यक्तिंची परवानगी असतांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रविवारी स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाहणी केली होती. त्यानुसार त्यांनी मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सहा मंगलकार्यालये तर सोमवारी चार मंगलकार्यालये सील केली आहेत.

यांच्यावर केली कारवाई

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने मनपा उपायुक्तांनी पोलीस बंदोबस्तात रविवारी मंगलकार्यालयावर कारवाई केल्यानंतरही सोमवारी पुन्हा जैसे थे परिस्थिती आढळून आली. त्यामुळे सोमवारी बालाणी लॉन्स्, आर्यनपार्क, शानभाग मंगल कार्यालय, हॉटेल रॉयल पॅलेसवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल देखील केले जाणार असल्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहे.

लग्न मंगल कार्यालय, लॉन्स चालकांना दंडात्मक नोटीस

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथरोग कोरोना प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र मंगलकार्यालये, लॉन्स् या ठिकाणी पाहणी केली असता, मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे मनपा प्रशासनाने रविवारी सहा तर सोमवारी चार असे एकूण दहा मंगलकार्यालये सीलची कारवाई केली आहे.

दरम्यान संबंधीत मंगलकार्यालय व लॉन्स् चालकांना दंडात्मक नोटीस बजावली असून, 24 तासांच्या आत खुलासा सादर करुन दंडात्मक रक्कम भरण्याचे आदेश मनपा उपायुक्तांनी दिले आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा व दंडात्मक रक्कम न भरल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या