Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रसाखर कामगार त्रिपक्षीय समितीची दुसरी बैठक संपन्न

साखर कामगार त्रिपक्षीय समितीची दुसरी बैठक संपन्न

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा

- Advertisement -

समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीची दुसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे राज्य साखर संघाचे कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी मागील थकीत वेतनावरच आडून असल्याने नवीन वेतनवाढीच्या प्रश्नाला बगल देत ही दुसरी बैठक ही निष्फळ ठरली.

मागील दि.16 डिसेंबर रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या पहिल्या बैठकीत अंतरिम वेतनवाढ नको तर अंतिम वेतनवाढ निर्णयासाठी कामगार संघटनांनी शासनाला 31 जानेवारीची डेडलाईन दिली होती.त्याच बरोबर थकीत वेतनावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे ठरले होते. त्यानुसार या दुसऱ्या बैठकीस सहकार मंत्री व कामगार मंत्री स्वतः उपस्थित राहिले. कामगार संघटनांनी थकीत वेतनाचा मुद्दा लावून धरला. त्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येत्या 15 दिवसात साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांची आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन थकीत वेतनाबाबद माहिती घेतो असे सांगितले.

मात्र सहकार मंत्री व कामगार मंत्री बैठकीतुन निघून गेल्यावर त्रिपक्षीय समितीने साखर कामगारांच्या नवीन वेतनवाढ व सेवा शर्तीवर चर्चा करून ठोस निर्णय घेणे अपेक्षित असतांना कामगार संघटनांच्या प्रतिनधिनी केवळ थकीत वेतनाचाच मुद्दा लावून धरल्याने वेतनवाढीचा मुख्य प्रश्न मागे पडला गेला.

या बैठकीला साखर कारखाना प्रतिनिधी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आ.प्रकाश आवाडे, अशोक कारखान्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, दुधगांगा वेदगांगा साखर कारखान्याचे के.पी.पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, बी.बी.ठोंबरे, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून आमदार भाई जगताप, महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन(इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे चिटणीस कॉ.आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, सदस्य सचिव तथा कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या