Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना संकट : राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

करोना संकट : राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं रौद्र रुप धारण केलं आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत असल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी करोना परिस्थितीत संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे.

करोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी पत्रामध्ये म्हंटलं आहे की, ‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे कारण आपला देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात सापडला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला हवं. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे. जगातील प्रत्येक सहा लोकांमध्ये एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात व्हायरसला आपलं स्वरूप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे.’ असे त्यांनी म्हंटल आहे.

तसेच ‘सध्याची परिस्थिती पाहता डबल म्यूटेंट आणि ट्रिपल म्यूटेंट पाहायला मिळत आहे, याची मला भीती वाटते. या व्हायरचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे फक्त देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं. हा व्हायरस आणि त्याच्या विविध प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हायला हवा. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवं. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी’ असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे. केंद्र सरकारकडे करोना विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कोणतीही स्पष्ट रणनीती नसल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच २ लाख ३४ हजार ८३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशभरात ३६ लाख ४५ हजार १६४ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात १८ लाख २६ हजार ४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतात २९ कोटी ८६ लाख १ हजार ६९९ जणांची कोरोना चाचणी केली आहे, अशी माहिती ICMR ने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या