Monday, May 6, 2024
Homeनगरसचिवाच्या बदलीसाठी चिलेखनवाडी सोसायटी पदाधिकार्‍यांचे उपोषण

सचिवाच्या बदलीसाठी चिलेखनवाडी सोसायटी पदाधिकार्‍यांचे उपोषण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

संस्थेतून बदली झालेल्या सचिवाने पदभार सोडून नवीन नियुक्त झालेल्या सचिवाकडे पदभार सोपवावा या मागणीसाठी तालुक्यातील चिलेखनवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी नेवासा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर उपोषण केले.

- Advertisement -

निवेदनात सोसायटी पदाधिकार्‍यांनी म्हटले की, संस्थेचे सचिव अंबादास नाथा गुंजाळ यांची संस्थेमधून बदली झालेली असून त्यांच्या जागी दत्तात्रय कडूबा आरगडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु अंबादास गुंजाळ संस्थेचा पदभार सोडण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सदर संस्थेचे कामकाज बर्‍याच दिवसापासून बंद आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. पदभार नव्या सचिवाकडे न सोपवल्यास सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही पदभार न दिल्याने उपोषण सुरू केले. दोन दिवसांत सचिवाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

सोसायटीच्या अध्यक्ष संगीता सावंत, उपाध्यक्ष भानुदास भातांबरे, संचालक विठ्ठल लक्ष्मण धोत्रे, पांडुरंग तुकाराम पवार, सिमोन मोहन कांबळे, शोभा जगन्नाथ लोखंडे, लताबाई दिगंबर सावंत, माजी सरपंच तुकाराम गुंजाळ, माजी सरपंच संजय सावंत आदी उपोषणात सहभागी झाले होते.

दोन्ही सचिवांचा लेखी खुलासा

नवे सचिव डी. के. आरगडे हे संस्थेत चार्ज घेण्यास हजर झाले नाहीत. त्यामुळे मी चार्ज देऊ शकलो नाही. सदर सचिव हजर झाल्यास मी चार्ज देण्यास तयार आहे असा लेखी खुलासा सचिव गुंजाळ यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर केला. नवीन नियुक्ती झालेले सचिव दत्तात्रय कडूबा आरगडे यांनी दिलेल्या लेखी खुलाशात सध्या माझ्याकडे सौंदाळा संस्थेचा चार्ज आहे. माझी तब्बेत ठिक नसल्याने व मला रक्तदाबाचा त्रास असल्याने मी चिलेखनवाडी संस्थेचा चार्ज घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

पत्नीला शिवीगाळ व धमकीचा आरोप

संस्थेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षांच्या पतीचा संस्थेशी संबंध नसून ते व त्यांचे समर्थक माझ्या घरी दररोज येऊन घरच्यांना दमदाटी व शिवीगाळ करत आहेत. त्यांनी माझ्या पत्नीस अपशब्द वापरुन शिवीगाळ केलेली आहे. तुझा पती गावातून बदली करून न गेल्यास त्याच्या जिवीतास हानी करू अशी धमकी त्यांनी दिली असल्याचा आरोप बदली झालेले सचिव अंबादास नाथा गुंजाळ यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या