पुणे | प्रतिनिधी Pune
पुणे विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल ३३.६० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या प्रकरणात अंजिलमुथिप्पलाथिंकल मजीद (वय २०, रा. त्रिशूर, केरळ) याला अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटने पुण्यात आला होता.विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याला थांबवून तपासणी केली.
सुरुवातीला त्याची वैयक्तिक झडती घेतली असता काहीही आढळले नाही. मात्र, त्याच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान आरोपीच्या बॅकपॅकमध्ये कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले दोन पारदर्शक पॅकेट सापडले. ही पॅकेट्स कार्बन पेपरमध्ये गुंडाळून व्हॅक्यूम सील करण्यात आली होती, ज्यामुळे वास बाहेर येऊ नये आणि स्कॅनिंग यंत्रणेतूनही सहज सुटावे, असा त्याचा प्रयत्न होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला.
पॅकेट उघडून पाहिल्यानंतर त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या गांजाचे वजन सुमारे 960 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३३.६० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा गांजा भारतात तस्करी करून विक्री करण्याच्या उद्देशाने आणत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.





