Wednesday, May 8, 2024
Homeब्लॉगआवड स्वत:ची,निवड करिअरची

आवड स्वत:ची,निवड करिअरची

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरचा वाटा यात काही संबंध असू शकतो हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, जानेवारी महिना सुरू झाला आणि तुम्हां सर्वांना परीक्षेचे वेध लागलेत. तुम्ही आता अभ्यासाला लागले असणार. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आजचे जग स्पर्धेचे आहे, हे तुम्हांंला सर्वजण सांगत असतात आणि स्पर्धेत टिकायचे तर अभ्यास केलाच पाहिजे, असे वारंवार सांगण्यात येत असते. तुम्ही अशी वाक्ये ऐकून नक्कीच वैतागतात. जो तो उठतो नि एकच उपदेश करत असतो. पण माझ्या लाडक्या लेकरांनो, मी काही तुम्हाला उपदेश वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही.

मी फक्त तुमच्याशी गप्पा करणार आहे. हे पहा, तुमच्यापैकी कितीतरी मुलामुलींना खेळायला आवडते, गाणी ऐकायला आवडते, चित्रपट पाहायला आवडते, गोष्टी ऐकायला किंवा सांगायला आवडते, विनोद सांगायला किंवा विनोद करायला आवडतो, दुसर्‍याची नक्कल करायला आवडते, घरातील इलेक्ट्रिकच्या वस्तू खोलून पाहायला व जोडायला आवडते अशा हजारो गोष्टी आवडीच्या असतात ना! तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, अशा हजारो आवडींमधून नेमकी स्वतःची आवड कशी ओळखायची? तर आता आपण एक खेळच खेळू या. खेळ म्हणताच किती आनंद झाला, खरे आहे ना! चला तर मग आता खेळासाठी एका कागदावर पाच सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. तुम्हांला त्रिज्या, वर्तुळ शब्द ऐकून मी गणित शिकवते की काय? अशी शंका नक्कीच आली असेल. आपण गणित नाहीतर खेळच खेळणार आहोत. आता वर्तुळाच्या मध्ये ‘माझी आवड’ असे लिहा. लिहिले ना. मग आता वर्तुळाच्या बाजूने तुम्हांला आवडणार्‍या सर्व गोष्टी लिहा. लिहिले ना! आता या खेळाचा पुढचा भाग मी तुम्हांला पुढच्या भागात सांगेन. तोपर्यंत वर्तुळाच्या बाजूने तुम्हांला आवडणार्‍या सर्व गोष्टी आठवून लिहण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्यासारख्याच दर्शना नावाच्या मुलीने तिची आवड कळविल्यावर तिच्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पा ऐका.

- Advertisement -

इयत्ता नववीत शिकणार्‍या दर्शनाला फॅशन डिझायनर व्हायचे होते. इयत्ता नववीतच करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयी ठाम असणार्‍या दर्शनाचे मला खूपच कौतुक वाटले. अनेक मुला-मुलींना कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाही करिअरची वाट सापडत नाही, तेथे दर्शनाने नववीतच स्वतःच्या करिअरविषयी डोळसपणे विचार केला; तेव्हा खूप आनंद झाला. दर्शनाला मी अगदी रोजच्या जगण्यातील साध्या साध्या गोष्टींविषयी सुचविले. तेव्हा ती म्हणाली, आता मी फॅशन डिझायनरच होणार. दर्शनाला मी पत्राद्वारे जे मार्गदर्शन केले होते, तेच तुम्हांंलाही सांगण्याचा प्रयत्न. कदाचित तुम्हांंला पण तुमच्या करिअरसाठी फायदा झाला; तर मला नक्कीच आनंद होईल. दर्शनाला लिहिलेले पत्र असे होते,

चि. दर्शनास, शुभाशीर्वाद.दर्शना, तुला फॅशन डिझायनर व्हायचे आहे. हे वाचून आनंद वाटला. कारण एक वेगळे क्षेत्र निवडले त्याबद्दल अभिनंदन! फॅशन डिझायनर होण्यासाठी तुला इतरांच्या पोशाखांचे व दागदागिने यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या व्यक्तीला कोणता पोशाख अधिक चांगला दिसेल, याविषयी विचार करीत राहणे. यात कपड्यांची रंगसंगती, व्यवसाय, वातावरण व व्यक्तिमत्त्व या बाबींचा सखोल अभ्यास करण्याची सवय आत्तापासूनच लावून घेणे. टीव्हीवरील कलाकारांच्या भूमिकेनुसार असणार्‍या पोशाखांचे निरीक्षण करणे. आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या व्यक्तींच्या पोशाखांचे बारकाईने निरीक्षण केल्यास तुझ्या ज्ञानात भर पडेल व तुझा यशाचा मार्ग सुकर होईल. गणितातील पाव सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर, पाऊण सेंटीमीटर, पाव इंच, अर्धा इंच, पाऊण इंच इत्यादी परिमाणे नीट समजून घेणे. फॅशन डिझायनरचा डिप्लोमा केल्यानंतर त्यापुढील पदवी शिक्षणही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. उन्हाळ्याच्या सुटीत घराजवळील शिवणक्लासमध्ये बेसिक शिक्षण घेतल्यास तुला फॅशन डिझाईनिंगचा डिप्लोमा व पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे सहज सोपे होईल. प्रदर्शनात कपड्यांच्या स्टॉलला भेट देऊन कपड्यांवरील वर्क किंवा पेटिंग कोणत्या प्रदेशात केले जाते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. जसे काश्मिरी वर्क, मधुबनी, वारली पेटिंग इ. तसेच स्वतःची कल्पकता वापरून वेगवेगळी डिझाईन्स तयार करण्याचा प्रयत्न करावा. दर्शना, तुला तुझ्या क्षेत्रात उत्तुंग यश गाठायचे आहे, तेव्हा तू प्रथितयश ड्रेस डिझायनर असणार्‍या व्यक्तींचे चरित्र अवश्य वाच. भारतातले प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा, नीता लुल्ला, अनामिका खन्ना, मसाबा गुप्ता यांच्याविषयी जाणून घे म्हणजे या व्यवसायातील अडचणी, त्रुटी कळतील. दर्शना, ड्रेस डिझायनिंगचे क्षेत्र हे सतत बदलत राहणारे आहे. कालची फॅशन आज बाद होणारी असते म्हणून नावीन्याचा सतत ध्यास घेत अप टू डेट राहावे लागते. ड्रेस डिझायनर म्हणजे चित्रपटातील तारे तारकांचेच कपडे शिवणे इतपतच मर्यादित क्षेत्र नव्हे तर आपण जेथे राहतो त्या भागातील नागरिकांचे उत्तमात उत्तम कपडे शिवणे व सण-समारंभासाठी विशेष वेशभूषा करून देण्याचा सध्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना प्रचंड मागणी आहे. स्वतःचे बुटीक टाकणे किंवा इतर बुटीकसाठी सल्लागार म्हणूनही काम करता येते. या क्षेत्रात इतरही अनेक संधी आहेत. तूर्तास एवढेच.

तुला खूप खूप शुभेच्छा!

तुझीच, ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या