Sunday, May 19, 2024
Homeजळगावनिःस्वार्थ दीदी!

निःस्वार्थ दीदी!

भारताचेच नव्हेतर सार्‍या जगाचे मन जिंकणारी दीदी नेहमीच निरागस होती. दीदीचे मन अगदी पारिजातकाच्या फुलासारखे होते. तिच्या स्वरातील आर्तता तिच्या संवेदनशील मनामुळे अधिक आर्त झाली होती. ही आर्तता इतकी विलक्षण होती की म्हातार्‍या माणसांनी- अगदी वृंदावनातल्या साधूंनी तिच्या पायांखालची माती डोक्याला लावताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. कलाकार या शब्दाची अस्सल ओतीव मूर्ती होती ती. तिच्या विश्वव्यापी कलेचे रहस्य तिच्या इवल्याशा प्रेमळ नि:स्वार्थी हृदयात सामावलेले होतेे. चार-पाच भाषा सहज बोलता येणे, एका रिहर्सलमध्ये सबंध गाणे पाठ होणे, कुठल्याही भाषेत गाणे म्हणणे, सहजगत्या नोटेशन करणे, चाल बांधणे, ताना, मुरक्या, खडक सहज तालात बसविणे, हे सारे त्या विधात्याकडून तिला जी अतिनाजूक अशी प्रतिभा लाभली त्यामुळे होते. संगीत दिग्दर्शकाचे सूर आणि कवीचे शब्द घेऊन दीदी ज्यावेळी गायची त्यावेळी संगीत दिग्दर्शकाचे सूर आणि कवीचे शब्द ज्या एका सुप्त रसाला, सुखाला, दु:खाला, प्रीतीला, भक्तीला स्पर्श करू शकत नाहीत, त्या रसाला तिचा स्वर सहज स्पर्श करून यायचा. पण तिच्या स्वरामध्ये जी अतीव आर्तता भरून राहिली होती. ती तिला समाजाकडून मिळाली होती.

दीदीचे बालपण प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यात गेले. मला आठवतंय, आम्ही सारे जण कोल्हापूरला पेंटरांच्या घरात राहात होतो, तेव्हा दीदीला ‘प्रफुल्ल’ मध्ये नोकरी लागली होती. अवघ्या 14 वर्षांची होती तेव्हा ती ! घरात खाणारी तोंडे आठ-दहा आणि कमावणारी ती एकटीच. त्यातच मला बोन टी. बी. झालेला. घरात दारिद्य्र भरून राहिलेलं होतं. मी आणि उषाताई सगळ्यात लहान म्हणून दिदीचे आम्ही अधिक लाडके होतो. पण गरीबीमुळे आमचे कौतुक तिला करता येत नसे. तिला तर खूप वाटे, की बाळला नवीन कपडे शिवावेत, उषाला फ्रॉक शिवावा, माईसाठी एखादी चांगली साडी घ्यावी, पण परिस्थितीमुळे काहीएक शक्य होत नसे. उलट बाबांचे नाटकातले जुने शालू फाडून दिदीला परकर, पोलका शिवावा लागत असे. पण एके दिवशी तिने कमाल केली आपली इच्छा तिने वेगळ्या पद्धतीने पुरी केली. कै. विनायकरावांच्या चित्रपटात लहान मुलांसाठी खलाशी कपडे शिवले होते, निळ्या आणि पांढर्‍या रंगांचे. त्यातून दोन जोड्या दीदीने विनायरावांकडून मागू आणल्या. आम्ही ते अंगाला न येणारे कपडे घालून किती आनंदित झालो होतो, याची कल्पना त्या परिस्थितीत गेल्याशिवाय येणार नाही. दीदीचे तोंड आनंदाचे नुसते फुलून गेेले होतेे. दीदीचा तो चेहरा माझ्या नजरेपुढून कधी हलणार नाही.

- Advertisement -

‘माझं बाळ’ या चित्रपटात एक प्रसंग होता. अनाथश्रमाची मुले मदत मागत आहेत. त्यांच्या तोंडी एक समूहगीत होते. आम्ही पाचही जण त्या गीतामध्ये आहोत. शालिनी पॅलेससमोर ते चित्रण होते. दुपारच्या कडक उन्हामध्ये आम्ही पाच भावंडे चित्रणासाठी उभे होतो. खरंच, आम्ही त्या दृश्यातल्याइतकेच अनाथ होतो. सारे जग आमच्यावर उलटल्याचा भास होत असे. पण दीदीचे हात फार मजबूत ठरले. सार्‍या चित्राचे रंग बदलले. 1948 सालची लता मंगेशकर. किती प्रचंड फरक होता. सगळेच काही बदलले होते. पाठीशी होता नुसता अंधकार, हुंदके, उसासे; तर पुढे नुसता आनंद, उत्साह आणि उमेद.

दीदीच्या आमच्या बाबतीतील उत्साहालाही मर्यादा नव्हती. आम्हाला कुठे ठेवू आणि कोठे नको असे तिला झाले होते. परिस्थितीने दाबलेल्या तिच्या सार्‍या इच्छा वर उफाळून आल्या होत्या. आज बाळसाठी सूट, तर उषासाठी फ्रॉक, तर माईसाठी हार काय घेऊ आणि काय नको असे तिला झाले होते. दोन दिवसांत तिने कपड्या-दागिन्यांनी आम्हाला नुसते मढवून टाकले. आमचे लाड करण्याची स्वत:ची हौस तिने भागवून घेतली. पण स्वत:साठी मात्र तिने एकही वस्तू हौसेने घेतली नाही. ती कधी हुरळून गेली नाही, की मातली नाही. स्थितप्रज्ञासारखी स्वत:कडे आणि बदलत्या परिस्थितीकडे पाहात राहिली ती. एकच परकर पोलका सहा महिने कसा वापरावा लागतो हे तिला माहीत होते. म्हणूनच इतके अफाट नाव कमावूनही तिला गर्व नावाची गोष्ट माहीतच नव्हती.

पंडित हृदयनाथ मंगेशकर

ज्येष्ठ गायक, संगीतकार (भाऊ)

- Advertisment -

ताज्या बातम्या