अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट फसवणूकप्रकरणी अटकेतील एका संशयित आरोपीविरूध्द पाच हजार पानी दोषारोपपत्र विशेष एमपीआयडी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. महेंद्र मंडलीक (वय 44, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्यात 20 आरोपी असून, त्यातील एकालाच पोलिसांनी अटक केली आहे. 13 जणांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून, सहा संशयित पसार आहेत.
सेनापती बापट मल्टीस्टेटच्या चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी स्वीकारल्या. मात्र, या ठेवी परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात 10 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पारनेर पोलिसांकडून येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाला त्यावेळी दोन कोटी 50 लाख 38 हजार 613 रूपयांची फसवणूक झाल्याचा आरोप होता.
मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. तसेच ठेवीदारांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरू केले. फॉरेन्सिक ऑडिटचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यावरून सुमारे सात कोटी 50 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ठेवीदारांचे जबाब व फॉरेन्सिक ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या गुन्ह्यात एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 13 जणांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांनी महेंद्र मंडलीक याला अटक करून त्याच्याविरूध्द तपास पूर्ण केल्यानंतर विशेष एमपीआयडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित संशयित आरोपींच्या भूमिकेबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. सेनापती बापट मल्टीस्टेटच्या सर्व शाखांमधील ठेवीदारांनी आपल्या अडकलेल्या ठेवींची माहिती व संबंधित कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करावीत, असे आवाहन शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद गोळे यांनी केले आहे.
123 ठेवीदारांचे जबाब नोंदविले
सेनापती बापट मल्टीस्टेटमधील अपहार समोर आल्यानंतर या मल्टीस्टेटवर पारनेर येथील सहनिबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका संशयित आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ठेवीदारांनी आपले जबाब नोंदविण्यासाठी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे गर्दी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 123 जणांचे जबाब नोंदविले असून, त्यातून सुमारे साडेसात कोटी रूपयांचा अपहार समोर आला आहे.
14 कोटी 88 लाखांच्या मालमत्ता जप्त
पोलिसांनी तपासादरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या नावे असलेल्या सुमारे 120 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये जमीन व प्लॉटचा समावेश आहे. या मालमत्तांचे बाजारमूल्य सुमारे 14 कोटी 88 लाख 76 हजार 655 रूपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले.




