राहाता | Rahata
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका सध्या एका भीषण सामाजिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शासनाच्या ‘बेटी बचाओ’च्या घोषणा केवळ कागदावरच उरल्या असून प्रत्यक्षात मात्र लेकींच्या कत्तलीचे ‘हायटेक कसाईखाने’ सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रॅकेटचे एकामागून एक पदर उलगडत असताना, आता या व्यवसायातील दलालांची कार्यपद्धती, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि लिंग ओळखण्यासाठी वापरले जाणारे धक्कादायक सांकेतिक शब्द ‘दैनिक सार्वमत’च्या विशेष ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आले आहेत.
हे रॅकेट थेट डॉक्टर किंवा हॉस्पिटलकडून सुरू होत नाही. यामध्ये ‘एजंट’ किंवा मध्यस्थ सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे एजंट ग्रामीण भागात, छोट्या क्लिनिकमध्ये किंवा सरकारी सोनोग्राफी केंद्रांच्या बाहेर सावजाच्या शोधात सक्रिय असतात. ज्या दांपत्यांना मुलगा हवा असतो, त्यांना जाळ्यात ओढले जाते. या रॅकेटचे वैशिष्ट्य असे की, जोपर्यंत एजंटला समोरच्या व्यक्तीची पूर्ण ओळख पटत नाही, तोपर्यंत कोणालाही मुख्य केंद्रापर्यंत नेले जात नाही. विश्वास संपादन केल्यानंतरच गुप्त ठिकाणी असलेल्या मशिनपर्यंत पोहोचवले जाते. ज्यामुळे मुख्य सुत्रधार नेहमीच पोलिसांच्या कचाट्यातून निसटतात.
या काळ्या धंद्यात माणुसकीपेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिले जात आहे. गर्भलिंग निदानासाठी 25 ते 30 हजार रुपये तर गर्भपातासाठी 50 ते 60 हजार रुपये उकळले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे दर सर्वांसाठी सारखे नसून गिर्हाईकाची आर्थिक परिस्थिती पाहून लाखांच्या घरातही वसुली केली जाते. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी सर्व व्यवहार केवळ ‘कॅश’मध्ये केले जातात, जेणेकरून कोणताही डिजिटल पुरावा मागे राहणार नाही. पीसीपीएनडीटी कायद्याच्या भीतीपोटी आता थेट शब्द उच्चारले जात नाहीत. जर गर्भात मुलगा असेल, तर दलाल हसतमुखाने गणपती बाप्पा पावला, पेढे तयार ठेवा किंवा नारळ फोडा असे सांगतात. याउलट मुलगी असल्यास महालक्ष्मी आली किंवा साखर वाटायला हरकत नाही असे कोडवर्ड वापरले जातात. काही ठिकाणी ‘एस ऑर नो’ असे संकेतही वापरले जातात.
मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधित कुटुंबावर गर्भपातासाठी मानसिक दबाव टाकला जातो. राहाता शहरातील काही बड्या हॉस्पिटल्समध्ये या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांऐवजी त्यांचे अप्रशिक्षित असिस्टंट किंवा नर्सेस उरकतात. कमी खर्चात जास्त नफ्यासाठी महिलांच्या जिवाशी खेळला जाणारा हा अघोरी खेळ अनेक महिलांना कायमचे अपंगत्व देणारा किंवा जिवावर बेतणारा ठरत आहे. साईबाबांच्या पावन भूमीजवळ असा पापधंदा चालणे हे दुर्दैवी आहे. 5 डिसेंबर रोजी प्रशासकीय पथकाची तपासणी होऊनही त्याच दिवशी पुन्हा चाचण्या होणे, हे यंत्रणेच्या अपयशाचे लक्षण आहे. नगर-मनमाड महामार्गावर परराज्यातील गाड्यांच्या रांगा या केंद्राबाहेर लागत असतानाही प्रशासन डोळे मिटून आहे. यामागे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार असल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांमुळे अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
राहाता तालुक्याचे लिंग गुणोत्तर खालावत चालले असून, आता केवळ नोटिसा बजावणे पुरेसे नाही. दलाल आणि डॉक्टरांच्या मालमत्तेची चौकशी करून ‘डेकॉय ऑपरेशन्स’द्वारे या पांढरपेशा गुन्हेगारांना कठोर कायदेशीर धडा शिकवण्याची गरज आहे, अन्यथा राहात्यातील लेकींचा श्वास असाच कोंडला जाणार आहे.
राहाता शहरात ‘गर्भलिंग चाचणी’चे रॅकेट चालवणे ही माणुसकीला लागलेली कीड आहे! पैशांच्या हव्यासापोटी चिमुरड्या कळ्यांची कत्तल करणार्या या गुन्हेगारांनी राहाता शहराचे नाव बदनाम केले आहे. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, या डॉक्टरांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. ‘बेटी बचाओ’चा नारा देणार्या महाराष्ट्रात अशा रॅकेटला पायबंद घालण्यासाठी आता कायद्यासोबतच जनतेनेही आक्रमक व्हायला हवे.
– डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजप नेते
दैनिक सार्वमतने मागील काही दिवसापासून राहाता शहरात चाललेला गर्भनिदान केंद्रात सरकारचे नियम व कायदा धाब्यावर ठेवून लिंग चाचणी करून जी माया जमवली जाते व प्रशासन जे डोळेझाक करत आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेऊन यावर आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबद्दल तीव्र आंदोलन करणार आहे. आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.
– गणेश जाधव, मनसे राहाता तालुकाध्यक्ष
राहाता शहराच्या माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आता सहन केले जाणार नाही. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत, अन्यथा वज्रेश्वरी प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल. दैनिक सार्वमतने सुरू केलेल्या या मोहिमेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. जे कायद्याला धरून नाही, ते समाजाला मान्य नाही. राहाता शहरात सुरू असलेल्या गंभीर प्रकारांचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी करतो.
– देवेंद्र भवर, अध्यक्ष, वज्रेश्वरी प्रतिष्ठान एकरुखे





