Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : हवा प्रदूषणाचे महासंकट!

शब्दगंध : हवा प्रदूषणाचे महासंकट!

महाराष्ट्रावर (Maharashtra) यंदा दुष्काळाचे (drought) संकट घोंघावत असताना हवा प्रदूषणाची (Air Pollution) भर त्यात पडली आहे. हवा प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीइतके हवा प्रदूषण आपल्याकडे नाही याबद्दल महाराष्ट्रातील शहरवासीय सुटकेचा नि:श्‍वास टाकत होते, पण दिल्लीसारखेच (Delhi) संकट मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही शहरांत निर्माण झाले आहे किंवा होऊ पाहत आहे.

प्रकाशाचा उत्सव असणार्‍या आणि आसमंत उजळून टाकणार्‍या दिवाळीचे घरोघर आगमन झाले आहे. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचा माहोल असताना मुंबईसह महाराष्ट्रावर हवा प्रदूषणाचे महासंकट चालून आले आहे. देशाची राजधानी दिल्लीवर हवा प्रदूषणाचे संकट दरवर्षी दिवाळीच्या काळात गडद होते. तसे ते आताही झाले आहे, पण हिरवाईचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीवरही हवा प्रदूषणाचे संकट घोंगावू लागले ही राज्यासाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे. राज्यातील पुणे, नाशिकसारखी शहरेही हवा प्रदूषणाचा सामना करत आहेत. स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी जो-तो धडपडत असतो, पण आता वातावरणच बिघडले आहे. शहरांचा आणि शहरातील माणसांचा श्‍वास कोंडणारी प्रदूषित हवा अवतीभोवती पसरत आहे, पण याची जाणीव किती जणांना आहे?

- Advertisement -

वातावरण बदलातून निर्माण झालेल्या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत असताना हवा प्रदूषणाचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे संकट घोंघावत असताना हवा प्रदूषणाची भर त्यात पडली आहे. राज्यातील जनतेची काळजी वाढवणारा हा प्रश्‍न आहे. वेगवेगळ्या कारणांनी हवा प्रदूषण होते. याबद्दलच्या चर्चाही केल्या जातात, पण त्याबाबत काळजीचा सूर अभावानेच निघतो. तथापि हवा प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीइतके हवा प्रदूषण आपल्याकडे नाही याबद्दल महाराष्ट्रातील शहरवासीय सुटकेचा नि:श्‍वास टाकत होते, पण दिल्लीसारखेच संकट मुंबईसह राज्यातील काही शहरांत निर्माण झाले आहे किंवा होऊ पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात हवा प्रदूषण वाढले आहे. पुणे, नाशिक इत्यादी शहरेही त्यास अपवाद नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. श्‍वसनाचे विकार वाढत आहेत. ते टाळण्यासाठी आणि आरोग्य जपण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून नागरिकांना सल्ले दिले जात आहेत.

हवा प्रदूषण रोखण्यासाठी खरे तर नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजे. दिवाळीत फटाके वाजवण्याची आवड कमी होत आहे, असे म्हटले जात असले तरी फटाके वाजवल्याशिवाय लोक राहणार नाहीत. दिवाळीच्या काळात हवा प्रदूषणाची पातळी नक्कीच वाढलेली असेल. ‘एक्यूएअर’ नावाच्या स्वीस संस्थेने केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता पाहणी निर्देशांकात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत तीन भारतीय शहरांचा समावेश आहे. त्यात दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता पाचव्या तर मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील लाहोर दुसर्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. दिल्लीची हवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मानक मर्यादेपेक्षा तब्बल वीस पट अधिक प्रदूषित आणि विषारी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सगळी माहिती आणि निष्कर्ष काळजात धडकी भरवणारे आहेत. दोन वर्षे करोना महामारीच्या जीवघेण्या वातावरणात घालवावी लागली. त्या महासंकटावर मात करण्यात भारत देश यशस्वी ठरला, पण करोनातून सुटका झाली असली तरी हवा प्रदूषणाचे महासंकट चालून आले आहे.

दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. दिल्लीत फटाक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे, पण एका समाज माध्यमाने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील 32 टक्के कुटुंबांना दिवाळीत फटाके वाजवण्याची हौस भागवून घ्यायची आहे. हवा प्रदूषणाचा नरकासूर दिल्लीत थैमान घालत असला तरी त्याची त्यांना पर्वा वाटत नाही. 42 टक्के कुटुंबांना मात्र प्रदूषणाची चिंता असून फटाके न वाजवण्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. दिल्लीनंतर वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. क्रमांक पहिला असो वा पाचवा; प्रदूषित शहरांत जगात पहिल्या दहा शहरांत भारतीय शहरे स्थान मिळवत आहेत ही काही भूषणावह बाब म्हणता येणार नाही. स्वच्छ हवेसाठी लोक आता महानगरे आणि शहरांतील गजबजाटापासून दूर मोकळ्या वातावरणात राहण्यास पसंती देऊ लागले आहेत. तरीसुद्धा हवा प्रदूषणाने शहरांनाच विळखा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोकळा श्‍वास घेण्यासाठी शहरांतील लोकांना दूर ग्रामीण भागात धाव घ्यावी लागते की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

मुंबईवर बेतलेले हवा प्रदूषणाचे संकट लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात मुंबईत फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले आहेत. दिवाळीत सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी असणार आहे. याच वेळेत आतषबाजी, हौशी लोकांनी फटाके वाजवायचे असले तरी निर्बंधांचे काटेकोर पालन होईल याबाबतची जबाबदारी मनपा प्रशासन आणि पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुंबईकर किती सहकार्य करतात ते पाहायचे. हवेची घसरती गुणवत्ता ही कोणा एकाची जबाबदारी नाही. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन त्यावर काम करून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, याचीही जाणीव न्यायालयाने करून दिली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरे व्यापणार्‍या गगनचुंबी इमारतींची वेगाने होणारी बांधकामे, शहरांतून संकलित होणारा कचरा आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या, त्यातून प्रदूषणात पडणारी भर, रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ इत्यादी अनेक कारणे हवा प्रदूषणाला सढळ हातभार लावत आहेत.

पीक कापणीनंतर शेतांत पडलेला काडी-कचरा आणि शहरांतून संकलित केलेला कचरा जाळण्याची वाढती प्रवृत्ती हवा प्रदूषणवाढीला हातभार लावत आहे. मुंबईसह राज्यातील प्रत्येक मनपा, नगरपालिका आणि त्या-त्या शहरात राहणारे नागरिक यांनी हवा प्रदूषणाबाबत वेळीच सजग होण्याची तसेच स्वतःवर काही बंधने पाळून घेण्याची आवश्यकता आहे. महानगरांतील चौकांतील सिग्नल, महामार्गांवरील नाके इत्यादी ठिकाणी अगदी दोन-पाच मिनिटे वाहने थांबली तरी वाहनांच्या धुराचा त्रास जाणवतो. त्यामुळे श्‍वास गुदमरल्यासारखे होते. हा अनुभव बहुतेक जण घेत असतील. हवेचे प्रदूषण होऊ नये व त्यात जाणता-अजाणता आपलाही हातभार लागणार नाही याची काळजी ज्याने-त्याने घेतली तरी हवा प्रदूषण रोखण्यास आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपा, नगरपालिका, राज्य सरकार इत्यादी सर्व यंत्रणांना मोठी मदत होईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या