नाशिक | Nashik
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार व नाशिकरोड-देवळाली-देवळाली कॅम्प-भगूर परिसराच्या विकासाचे शिल्पकार स्व. बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांचा आज (४ जानेवारी) स्मृतिदिन. ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक व राजकीय विश्लेषक कै. प्रा. के. पी. दुसाने यांनी स्व. देशमुख यांच्या प्रयत्नांनी झालेला नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) विकास व त्यांचे व्याही, महाराष्ट्राचे थोर नेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल लिहिलेला लेख यानिमित्ताने पुनर्मुद्रित करत आहोत.
सन १९७९ मध्ये स्व. इंदिरा गांधी यांनी बाळासाहेब देशमुख यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली तेव्हा देशभर बाळासाहेबांचे नाव झाले. शंकरराव नारायणराव देशमुख हे त्यांचे नाव. २९ ऑगस्ट १९१३ चा जन्म. देवळाली त्यांचे मूळ गाव, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वकील झाले आणि आयुष्यभर समाजसेवा केली. स्थानिक पातळीवर देवळाली ग्रामपंचायत सदस्य ते देवळाली नाशिकरोड नगरपालिकेचे नगराध्यक्ष (१९५२-१९६२) अशी पदे भूषवली. पुढे १९६७ ते १९७२ या काळासाठी ते देवळाली मतदारसंघाचे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले.
भगूर, देवळाली गाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोडच्या विकासाला त्यांनी मोठा हातभार लावला. सिमेंट काँक्रिटचे रस्ते, वाढत्या लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा, रुग्णालयांबरोबरच कोठारी कन्या शाळा, बिटको-चांडक महाविद्यालय अशी विविध क्षेत्रात त्यांनी कामे केली. लष्करी छावणी, प्रतिभूती मुद्रणालय, डिस्टिलरी यासारख्या शासकीय उपक्रमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच नागरीकरणाच्याही सुविधा आणल्या. कर्तृत्वाबरोबरच दातृत्व दाखवताना वखार महामंडळ, नाशिकरोड बसस्थानकासाठी जागा दान केल्या. पण प्रसिद्धीपासून मात्र लांब राहिले. आपले काम करत राहणे हाच त्यांचा स्वभाव होता. राज्यसभा सदस्य नियुक्तीमुळे या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली इतकेच.
याच काळात यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाबरोबर बाळासाहेब देसाई (दौलतराव श्रीपतराव देसाई १९१० ते १९८३) यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला. त्यांनीही प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून कराडला वकिली सुरू केली होती. सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे दीर्घकाळ अध्यक्ष (१९४१ ते १९५२), पाटणमधून आमदार, पुढे दीर्घकाळ मंत्री, उपमुख्यमंत्री (१९५७-७२) अशी मानाची पदे त्यांच्याकडे चालून आली. नंतर स्वतःहून मंत्रिपदाचा व काँग्रेसचाही राजीनामा दिला, १९७७ मध्ये जनता पक्षाचे आमदार (MLA) झाले. १९८० मध्ये इंदिरा काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. मात्र, तीनच वर्षांत १९८३ मध्ये त्यांचे निधन झाले.
स्व. यशवंतरावांचे अगदी जवळचे सहकारी (१९५२-७२) ते यशवंतरावांचे कठोर टीकाकार, धाडसी नेता, खरा लोकनेता अशी बाळासाहेबांची विविध रूपे महाराष्ट्राने पाहिली. १२०० रुपयांपर्यंतच्या उत्पक्षाची सवलत (सध्याची इबीसी), कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाची स्थापना, कोयना प्रकल्पाची उभारणी, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, मरळी (पाटण) साखर कारखाना उभारणी, कुस्तीगीर परिषद अध्यक्षपद असा सर्व क्षेत्रात त्यांचा संचार होता. अशा या दोन्ही ‘बाळासाहेबां’चा, दोन्हीं लोकनेत्यांचा ऋणानुबंध जुळला तो बाळासाहेब देसाईंच्या सुपुत्राच्या शिवाजीरावांच्या विवाहामुळे. देशमुखांची ‘विजया’ देसाईची ‘सून’ झाल्याने. ही घटना १९६४ मधील. विवाह अगदी साधेपणाने पार पडला. यशवंतराव चव्हाण, राज्यपाल डॉ. चेरियन यांची विवाह समारंभाला उपस्थिती होती.
बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांना विवाह मुंबईला करावयाचा होता. पण विजयाताईच्या आजीच्या इच्छेला (बाळासाहेब देशमुखांच्या मातोश्री) मान देऊन देसाईंनी हा विवाह नाशिकला संपन्न केला. शिवाजीराव देसाई पाटण सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष. दीर्घकाळ अध्यक्ष होते. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर (२३ जुलै १९८३) तीन वर्षांनी (१२ जुलै १९८६) शिवाजीरावांचेही देहावसान झाले. सध्या त्यांचे सुपुत्र शंभुराजे देसाई साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत आहेत. राज्य मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री यासारखे महत्त्वाचे पद सांभाळल्यानंतर सध्या शंभुराजे पर्यटन खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
देशमुख-देसाई विवाह तसा योगायोगच होता. स्व. देशमुख याबाबत म्हणाले होते की, हा एक चांगला योग होता. १९५८ मध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ होता. त्यावेळी देसाई साहेब भोजनासाठी आमच्या देवळालीच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी शाळकरी विजयाला पाहिले होते. पुढे अनुकूल बाबी घडत गेल्याने ६४ मध्ये विवाह झाला. मात्र, हा संबंध दोन राजकीय नेत्यांच्या राजकारणाचा नव्हे, तर दोन्ही समाजकारण्यांच्या समाजकारणाचा होता. तसे तर दोघे वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात होते. देशमुख इंदिरा निष्ठ होते आणि शेवटपर्यंत इंदिरा निष्ठच राहिले. देसाई चव्हाण निष्ठ होते. पुढे त्यांच्यात व चव्हाणांमध्ये दुरावा निर्माण झाला, स्व. देसाई त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे मस्तीत जगले, झुकले नाहीत. देसाई ८३ मध्ये तर चव्हाण ८४ मध्ये इहलोकीची यात्रा संपवून गेले.
बाळासाहेब देशमुखांच्या राजकीय जीवनातही चढउतार आले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ७९ पर्यंत सत्ताविहीन होते, ७९ मध्ये खासदार झाल्यावर पुन: सक्रिय झाले. खासदार असताना कमाल जमीन धारणा विधेयकावर सलग १७ तास भाषण करून कायदा रद्द बातल होण्यासाठी केलेले प्रयत्न ही त्यांची फार मोठी व असाधारण कामगिरी म्हणावी लागेल. दोन्ही बाळासाहेबांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आज भगूर-देवळाली गाव-देवळाली कॅम्प नाशिकरोड भागाच्या आज विकसित रूपात दिसते. स्व. बाळासाहेबांना ९६ वर्षांचे दीर्घायुष्य प्राप्त झाले. ४ जानेवारी २००९ रोजी त्यांचे देहावसान झाले. या दोन्ही महान विभूतींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण स्मारक करणे हे आपले कर्तव्य ठरेल.
(लेखक कै. प्रा. के. पी. अर्थात काशिनाथ पुंजाराम दुसाने हे मूळचे दाभाडी येथील सुवर्णकार समाजातील. तेथील प्रसिद्ध अशा शेतकी विद्यामंदिरातून सन १९५१ मध्ये तत्कालीन सातवीच्या परीक्षेत ते राज्यात प्रथम आले होते. पूज्य साने गुरुजी व भाऊसाहेब हिरे यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांनी दीर्घकाळ मराठी व इंग्रजी पत्रकारिता केली. ते महाराष्ट्राच्या बदलत्याराजकीय स्थितीचे विश्लेषक होते. संगमनेर येथे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. १२ मार्च २०२१ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.)




