Sunday, July 26, 2026
Homeक्राईम​Shalarth ID Scam : कवितेत 'ऋतूपर्व', प्रत्यक्षात फसवणुकीचे पर्व! माजी शिक्षणाधिकारी हिंगोणेकर...

​Shalarth ID Scam : कवितेत ‘ऋतूपर्व’, प्रत्यक्षात फसवणुकीचे पर्व! माजी शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांचा दुहेरी पर्दाफाश

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘शालार्थ घोटाळा’ आणि बोगस मान्यता प्रकरणातील धागेदोरे अधिकच झाले आहेत. याच प्रकरणात नाशिक एसआयटीने (Nashik SIT) (दि. २४) जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्रसिद्ध कवी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना धुळ्यातून बेड्या ठोकल्या. एकीकडे मराठी साहित्यात आपल्या समृद्ध काव्यसंग्रहासाठी मानाचे राज्य पुरस्कार पटकावणारे हिंगोणेकर, तर दुसरीकडे शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या बोगस मान्यतेच्या खेळात मास्टरमाइंड ठरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या या ‘कवी ते तुरुंगवारी’ पर्यंतच्या प्रवासाने शिक्षण व साहित्यिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

​पोलिसांच्या (Police) तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोणेकर यांनी सन २०११ ते २०१५ मध्ये जळगाव येथील कार्यकाळात शेकडो बोगस व वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, यापूर्वी अमळनेर पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर ताराचंद जगदेव यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. टाकरखेड्यातील माध्यमिक विद्यालयासाठी माजी प्राचार्य संशयित ए. एन. माळी, उदय नंदकिशोर पाटील, प्रा. धीरज रतीलाल वैष्णव आणि गुलाब आसाराम पाटील यांनी कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना २२ ऑगस्ट २०१४ रोजी खोटा अजेंडा तयार केला होता.

माळी यांनी स्वतःला संस्थेचे अध्यक्ष भासवून शिक्षण मंडळाकडे मान्यता मिळवण्यासाठी बनावट प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर (Shashikant Hingonekar) यांना या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण कल्पना होती. असे असतानाही त्यांनी या खोट्या आणि बनावट प्रस्तावाला वरची शिफारस देत शासनाची आणि शिक्षण विभागाची सर्रास फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. याच बनावटगिरीत नाशिकचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक बी. एस. सूर्यवंशी यांनीही सहमती दर्शवत संस्थेच्या विकासाला व कायदेशीर प्रक्रियेला सुरुंग लावला होता. न्यायालयाच्या (Court) आदेशानुसार २०१७ मध्ये अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शालार्थ घोटाळ्याच्या ताज्या तपासात हिंगोणेकरांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहे. 

​विरोधाभास

एका बाजूला मानवी जीवन आणि निसर्गाच्या संवेदना टिपणारी कविता लिहिणारे हिंगोणेकर, तर दुसऱ्या बाजूला बोगस शालार्थ आयडी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ‘छलचक्रात’ अडकल्याने साहित्य वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हिंगोणेकर यांनी कारकिर्दीत लातूर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. कवी अनंत फंदी, अस्मितादर्श, बालकवी काव्य पुरस्कारांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. 

संवेदनशील कवीचे कृष्णकृत्य

​नाशिकरोड पोलीस ठाण्यात मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या घोटाळ्याच्या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १२०० हून अधिक संशयित निष्पन्न झाले आहेत. बॅकडेटेड आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून तब्बल १६० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात शिक्षण संस्थेचालक, मुख्याध्यापक, वेतन पथकाचे अधिकारी यांच्यासह अनेक मोठे मासे अडकले असून, एसआयटीप्रमुख व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके व पथक अधिक तपास करत आहेत. कवितेच्या ओळींमधून मानवी मूल्यांची, संवेदनेची भाषा बोलणारे हिंगोणेकर प्रत्यक्षात शालार्थच्या जंजाळात अडकल्याने शिक्षण आणि साहित्यिक दोन्ही क्षेत्रे हादरली आहेत.

मुद्दे

​-कागदावर ‘ऋतूपर्व’ अन् कारभारात ‘छलचक्र’!
​- साहित्यिक ओळख: शशिकांत हिंगोणेकर हे शिक्षण अधिकारीच नाहीतर ते एक मराठी कवी म्हणून राज्यभर परिचित आहेत.
-​मानाचा पुरस्कार : त्यांच्या ‘ऋतूपर्व’ या गाजलेल्या काव्यसंग्रहाला सन २०१७ चा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी दिला जाणारा ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार’ जाहीर झाला होता. याशिवाय त्यांना कवी केशवसूत पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
-​प्रमुखकृती: ‘युद्ध सुरू आहे’, ‘अंतर्भेदी’, ‘कवितेचे दिवस’, ‘नवे स्वगत’, ‘छलचक्र’, ‘मोकळे आकाश’ आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : डिलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची साडेसात लाखांची फसवणूक

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik अंबडगाव (एमआयडीसी) परिसरातील (Ambad gaon MIDC) एका हार्डवेअर दुकानदाराची 'एशियन पेंट्स' कंपनीची डिलरशिप मिळवण्याच्या नादात तब्बल ७ लाख ४९ हजार...