नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून समोर आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची (Shalarth ID Scam) व्याप्ती जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, याचे धागेदोरे राज्याच्या शिक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्याचा एजंट व सूत्रधार प्रशांत वाडीले याच्या पोलीस कोठडीत नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा वाढ केली असून, या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचे कलम (मोक्का) वाढवले आहे. वाडीलेने धुळे जिल्हा परिषद आणि नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचे उघड झाले आहे.
संशयित प्रशांत वाडीले (Prashant Wadile) याच्या घरझडतीत आणि मोबाईल तपासात ‘एसआयटी’ला गंभीर पुरावे मिळाले आहेत. शिक्षण मंत्रालयातील कक्ष अधिकारी, अवर सचिव आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बनावट पत्रे तयार करण्यात आल्याचे समाेर आले असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी व जनसंपर्क अधिकारी प्रमोद कदम यांच्या नावाचे विना-स्वाक्षरीचे पत्र, मंत्रालयातील कक्ष अधिकारी व जनमाहिती अधिकारी कविता तोंडे यांच्या नावाचे विना-स्वाक्षरीचे पत्र आणि घरझडतीत त्यांची स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे व मंत्रालयातील अवर सचिव यांच्या नावाचे, विना-जावक आणि विना-तारखेचे माध्यमिक शाळा स्थलांतर परवानगीबाबतचे पत्र जप्त मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहे.
वाडीले हा स्वतः आठ शाळांचा संस्थाचालक असून, त्यापैकी २ शाळा २० टक्के अनुदानित आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये तो स्वतः आणि त्याची पत्नी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वाडीलेच्या घरातून प्रिंटर, संगणकाचे केबल्स जप्त करण्यात आले असून, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याने संगणक आणि लॅपटॉप इतरत्र लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील (District) शाळांचे ‘कव्हरिंग लोगो’ आणि ‘कोरे लेटरहेड’ सापडले आहेत. तसेच, वेतन अधीक्षकांना ‘शालार्थ पासवर्ड रिसेट’ करून मिळण्याबाबतची विना-स्वाक्षरी आणि विना-जावक क्रमांकाची पत्रेही आढळून आली आहेत.
१८ जणांचे ‘शालार्थ आयडी’ आणि पगार
वाडीलेने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटणगाव पंच मंडळाच्या आशापुरी हायस्कूलमधील ६ जण आणि साक्री तालुक्यातील पिंजारझाडी येथील एज्युकेशन सोसायटीतील १२ जण अशा एकूण १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार केले. तत्कालीन वेतन अधीक्षक संशयित राजमोहन शर्मा व मिनाक्षी गिरी यांच्या संगनमताने या १८ जणांचे वेतनही शासनाकडून लाटण्यात आले. हा आयडी नक्की कोणाच्या सांगण्यावरून व मदतीने तयार केला, याचा तपास सध्या सुरू आहे. या घाेटाळ्याचा तपास एसआयटी प्रमुख व गुन्हेशाखेचे सहाय्यक पाेलिस आयुक्त संदीप मिटके करत आहेत.
५० हून अधिक शिक्षकांची बनावट मान्यता
तपासादरम्यान वाडीलेने १० पेक्षा जास्त संस्था आणि ५० हून अधिक शिक्षकांची बनावट वैयक्तिक मान्यता, ‘शालार्थ आयडी’ व वेतन मान्यता आदेश तयार केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे १०० पेक्षा जास्त संस्थांचे बनावट संच मान्यतेचे आदेश सापडले आहेत. या गैरव्यवहारातून त्याने मोठी चल-अचल संपत्ती गोळा केल्याचे कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, आंबेजोगाई, जालना, अकोला या जिल्ह्यांतील शाळांची कागदपत्रेही त्याच्याकडे मिळून आली आहेत. डे केअर सेंटर प्राथमिक विद्यालयाचे संस्थाचालक गोपाळराव पाटील यांच्याशी वाडीलेने आर्थिक व्यवहार आणि ‘शालार्थ आयडी’बाबत मोबाईलवर संभाषण केल्याचे व पासवर्ड घेतल्याचे चॅट्सवरून स्पष्ट झाले आहे.
नितीन उपासनींचा वैद्यकीय अहवाल मंजूर
या गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हा सध्या कारागृहात आहे. कोर्टाच्या आदेशानुसार कारागृह प्रशासनाने त्याची वैद्यकीय तपासणी केली असून, त्याचा अहवाल न्यायालयाने मंजूर केला आहे. या खटल्याची नियमित सुनावणी सुरू असून, पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी आता ३० जुलै रोजी होणार आहे.
मुद्दे
शिक्षकांच्या पगार लाटण्यात वेतन अधीक्षकांचे संगनमत
संस्थाचालक वाडीलेच्या घरात बनावट पत्रांचे कारखाने
धुळे, साक्री तालुक्यात १८ बनावट ‘शालार्थ आयडी’
मंत्रालयीन बड्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे खेळ
पुरावे नष्ट करण्यासाठी लॅपटॉप, संगणक गायब
पाच जिल्ह्यांतील शाळांची संशयास्पद कागदपत्रे जप्त
संस्थाचालक गोपाळराव पाटील यांच्याशी आर्थिक व्यवहार




