Sunday, October 18, 2026
Homeनगरसातव्या माळेला मोहोटागडावर अलोट गर्दी; उन्हाच्या झळा सोसत लाखो भाविकांचे मोहटादेवीच्या चरणी...

सातव्या माळेला मोहोटागडावर अलोट गर्दी; उन्हाच्या झळा सोसत लाखो भाविकांचे मोहटादेवीच्या चरणी लीन

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी )

अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेनिमित्त शनिवारी (दि. १७) भाविकांची मोठी गर्दी झाली. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि दुष्काळी परिस्थितीची पर्वा न करता भाविकांनी आई जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता. देवीच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला, तर वाढत्या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीवर ताण निर्माण झाला.

- Advertisement -

सहाव्या माळेपासूनच मोहटादेवी गडाकडे भाविकांचा ओघ वाढला होता. सातव्या माळेला विशेष महत्त्व असल्याने राज्याच्या विविध भागांतून महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबीयांसह भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. नवसपूर्ती, पूजा-अर्चा आणि आई जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. बीड राज्य महामार्गापासून मोहटादेवी गडाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाच ठिकाणी गेट उभारून मोठ्या वाहनांची वाहतूक टप्प्याटप्प्याने नियंत्रित करण्यात आली.

खाजगी पार्किंग वाल्याची मनमानी पाहायला मिळाली त्यामुळे अनेक भाविकांना याचा त्रास सहन करावा लागेल. मात्र, भाविकांची मोठी संख्या आणि वाहनांची वर्दळ यामुळे सातव्या माळेला काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने भाविकांच्या प्रवासाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस, सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक विविध ठिकाणी तैनात होते. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या मदतीने रस्त्यांची स्वच्छता राखण्यावरही भर देण्यात आला.

दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उन्हामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने थंड पदार्थ, शीतपेये आणि थंड पाण्याच्या बाटल्यांना मोठी मागणी होती. पाथर्डी आगारासह विविध एसटी आगारांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष बसव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.पाथर्डी ते मोहटादेवीगड मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी मोफत फराळाचे स्टॉल उभारण्यात आले होते. मोहटादेवी येथे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत देवीभक्तांसाठी मोफत फराळ, चहा आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पायी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला.

श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दर्शनव्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन केले जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता, अशा प्रतिकूल परिस्थितीतही मोहटादेवीवरील भाविकांची श्रद्धा आणि उत्साह कायम असल्याचे सातव्या माळेच्या गर्दीतून दिसून आले. नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसांतही भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित यंत्रणांकडून व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे. यात्रा नियोजनाचे प्रशासकीय प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यात्रेवर लक्ष ठेवून आहेत.पोलीस निरीक्षक नितीन खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस बंद ठेवण्यात आला आहे. तर मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्क्ष तथा धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप व विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे हे देवी भक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत .

दरम्यान सातव्या माळेनिमित्त पहाटे विश्वस्त अँड.प्रसन्न दराडे तर सायंकाळी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी बंडू पठाडे, सुनील ओव्हाळ, शिवाजी दहिफळे, अमृत चोपडा हे उपस्थित होते.अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दुपारी मोहटादेवीचे दर्शन घेत कापूर आरती केली. यावेळी नगरसेवक बजरंग घोडके उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे आणि जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी त्यांचे स्वागत केले.दरम्यान, बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनीही नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेनिमित्त मोहटादेवीचे दर्शन घेतले होते. देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...