मुंबई । Mumbai
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्तेवर कायम राहणार आहे. एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत एनडीएने २० वर्षांनंतरही आपले वर्चस्व सिद्ध करत २०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत.
याउलट, विरोधी पक्षांच्या महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. प्रदीर्घ सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधी लाट (Anti-Incumbency) अपेक्षित असताना, या निवडणुकीत नितीश कुमार यांची ‘जादू’ कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, २०२० च्या तुलनेत २०२५ च्या निवडणुकीत एनडीएने अधिक जागा जिंकल्या आहेत.
बिहारच्या या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी मतदारांना पैशांचे वाटप झाले असल्याचा गंभीर आरोप केला. शरद पवार म्हणाले, “या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. मला अशी शंका आहे की, महिलांचा इतका मोठा सहभाग असणे म्हणजे १० हजार रुपयांच्या योजनेचा परिणाम असावा. सगळ्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०-१० हजार रुपये भरले गेले आणि त्याचाच हा परिणाम आहे.”
बिहारमध्ये झालेला हा प्रकार महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेसारखा असल्याचा उल्लेख करत शरद पवारांनी भविष्यातील निवडणुकांच्या पारदर्शकतेबद्दल चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले, “ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले, तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या मनात धक्का बसेल, याची मला चिंता वाटते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने गांभीर्याने केला पाहिजे.” ‘निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हायला हव्यात. १०-१० हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही. याचा लोकशाही प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे पाहिले पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
पैशांच्या वाटपाच्या या प्रवृत्तीवर टीका करताना शरद पवारांनी ५० वर्षांपूर्वीच्या बारामतीची आठवण सांगितली. “एकेकाळी, ५० वर्षांपूर्वी बारामतीचे वैशिष्ट्ये होते की, म्युनिसिपालटीची निवडणूक आली तर मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट पाहत बसायचे. वाटप झाले की निकाल कसा लागतो, हे दिसायचे.” “पण आता संबंध राज्यात १०-१० हजार रुपये वाटून निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ नव्हत्या, असे लोकांच्या मनात आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
पवारांनी पैशांच्या स्रोतावरही प्रश्न उपस्थित केला. “१० हजार रुपये प्रत्येकी वाटणे म्हणजे काय? निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशांचे वाटप झाले. हा पैसा कुठला? सरकारी तिजोरीतला. हा पैसा विकासकामांसाठी वापरला पाहिजे होता. याचा अर्थ निवडणुका गैरमार्गाने लढवल्या जात आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर आम्ही एकत्र बसून यावर विचार करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, “राज्यात लवकरच पंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होतील. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला आहे की, त्या-त्या तालुका आणि जिल्ह्यातील पक्षाच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा.” मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विचारले असता, “मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही. त्याबाबत तेव्हा निर्णय घेतला जाईल,” असे ते म्हणाले.




